Sangli News : जिल्हा बँकेच्या गव्हाण शाखेत सव्वाबारा लाखांचा अपहार

दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
Financial fraud
जिल्हा बँकेच्या गव्हाण शाखेत सव्वाबारा लाखांचा अपहारFile Photo
Published on
Updated on

तासगाव : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गव्हाण (ता. तासगाव) शाखेमध्ये शासनाच्या शेतकरी अनुदान खात्यावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्याच दोन जबाबदार अधिकाऱ्यांनी संगनमताने सुमारे 12 लाख 32 हजार 854 रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोघांविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बँकेचे अधिकारी प्रवीण कोळी यांनी फिर्याद दाखल केली आहे. या अपहार प्रकरणात शाखा अधिकारी बाबासाहेब बाळासाहेब पाटील (रा. बोरगाव) व बँक कर्मचारी अरुण दादासाहेब पाटील (रा. बिसूर) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात आणि शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, मुख्य संशयित अरुण दादासाहेब पाटील (रा. बिसूर) हा गव्हाण शाखेत सिनिअर असिस्टंट पदावर कार्यरत होता. त्याने 2019 ते 2020 या कालावधीत पदाचा गैरवापर करत शासकीय शेतकरी अनुदान खात्यांना लक्ष्य केले. संशयितांनी बँकेचे खातेदार परमेश्वर पाटील, रघुनाथ भगवान पाटील, दिलीप एकनाथ पाटील, सुभद्रा आकाराम घोरपडे व अशोक रंगनाथ जाधव या खातेदारांच्या संमतीशिवाय आणि त्यांना कोणतीही कल्पना न देता, त्यांच्या नावे स्लिपवर बनावट सह्या करून या रकमा परस्पर उचलल्या. हा अपहार सुरू असताना तत्कालीन शाखाधिकारी बाबासाहेब बाळासाहेब पाटील (रा. बोरगाव, ता. कवठेमहांकाळ) यांनी या कृत्याला मूकसंमती दिल्याचे तपासात समोर आले आहे.

बँकेच्या नियमानुसार मोठ्या रकमांच्या व्यवहारावेळी सह्यांची पडताळणी करणे ही शाखाधिकाऱ्याची जबाबदारी असते. मात्र पाटील यांनी या व्यवहारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि सह्यांची कोणतीही खातरजमा न करता संशयास्पद रकमा काढण्यास परवानगी दिली. या माध्यमातून बँकेची आणि शासनाची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. बँकेतील या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत अपहार झाल्याचे स्पष्टपणे सिद्ध झाल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सध्या तासगाव पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या अपहारामध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news