11th Admission : अकरावी प्रवेशाचा 'शेवट' कधी?

चार महिने उलटले; महाविद्यालये सुरू होऊनही प्रवेशाच्या फेऱ्या सुरूच
11th admission
11th admission file photo
Published on
Updated on

सांगली : दहावीचा निकाल लागून चार महिने उलटले, महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही एक-दोन महिने झाले; मात्र अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अद्याप संपलेली नाही. राज्यातील काही जागा रिक्त असल्याने प्रवेशाच्या फेऱ्या सुरूच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया नेमकी कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल दि. ८ मे रोजी जाहीर केला. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी, ११ मेपासून अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रारंभी संकेतस्थळ बंद पडणे, सर्व्हर डाऊन होणे यांसारख्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर प्रक्रिया सुरळीत झाली; मात्र प्रवेशाच्या विविध फेऱ्यांमुळे ती अद्याप सुरूच आहे. विशेष फेरीत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी महाविद्यालय वाटप झाले. संबंधित विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या सूचना आहेत.

मात्र ही फेरी संपल्यानंतरही सर्व जागा भरतील का, याबाबत साशंकता आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांच्या एकूण ४५ हजार ४० जागा उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ३६ हजार १७ आहे. त्यामुळे जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यातच पदविका, आयटीआय तसेच पॅरामेडिकल अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल असल्याने कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त जागांची संख्या आणखी वाढू शकते. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला चार महिने पूर्ण झाले असतानाही अद्याप प्रवेशाच्या फेऱ्या सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजनही लांबणीवर पडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news