

मांजर्डे : तासगाव आगारातील तासगाव - डोंगरसोनी बसचे चालक आणि वाहक यांनी कौलगे (ता. तासगाव) येथील निवृत्त मुख्याध्यापक शामराव नामदेव फडतरे (वय 96) यांच्याशी बसमध्ये हुज्जत घालत त्यांचे आधारकार्ड फाडले. त्यांना प्रवासात मध्येच उतरवले. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा फडतरे यांनी निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापकांना दिला आहे.
शनिवारी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान तासगाव-डोंगरसोनी जाणाऱ्या बसमध्ये शामराव फडतरे हे कौलगे गावी जाण्यासाठी बसले होते. बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. फडतरे यांनी महिला वाहकास शासन सवलतीप्रमाणे तिकीट मिळावे, यासाठी आधारकार्ड दाखविले. त्यांनी ते आधारकार्ड चालत नाही, पैसे द्यावे लागतील, असे म्हणत त्यांचे आधार कार्ड फाडून टाकले. तेव्हा ओळखीच्या एका प्रवाशाने वाद नको म्हणून तिकिटाचे 21 रुपये देण्यास सांगितले.
तसेच फडतरे यांचे ऐकून न घेता गाडी पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याची धमकी दिली. त्यांना प्रवासात मध्येच खाली उतरवले. याची सखोल चौकशी करून वाहक ए. के. कराळे व चालक सुनील भोसले यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा कुटुंबासह लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा फडतरे यांनी आगार व्यवस्थापक बालाजी गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी शिवसेनेचे प्रदीप माने, सुनील माने, पवन कोरटे उपस्थित होते.
आगार व्यवस्थापक बालाजी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, फडतरे यांची तक्रार आली असून त्यानुसार चालक आणि वाहक यांची चौकशी सुरू आहे. दोघांचे जबाब घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जाईल.