

शिराळा : वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा) येथे उसाचा फड पेटविताना लागलेल्या आगीत भाजून आनंदा रामचंद्र मोरे (वय 70) या वृद्धाचा मृत्यू झाला, तर त्यांचा भाऊ वसंत रामचंद्र मोरे (वय 75) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शिराळा पोलिसात शरद रामचंद्र मोरे यांनी वर्दी दिली. ही घटना शनिवारी (दि. 13) सायंकाळदरम्यान घडली.
शिराळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उसाचा फड पेटवण्यासाठी वसंत मोरे व भाऊ आनंदा मोरे शेतात शनिवारी सायंकाळी गेले होते. वसंत मोरे फड पेटवून बाहेर पडत असताना आगीत भाजून जखमी झाले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आनंदा मोरे रात्री उशिरापर्यंत घरी आले नाहीत, म्हणून ग्रामस्थांनी शोध घेतला. पण ते सापडले नाहीत.
सकाळी नऊच्या दरम्यान शेतात कडेला त्यांची सायकल दिसली. शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह भाजलेल्या अवस्थेत आढळून आला. तपास पोलिस हवालदार सुनील पेटकर करीत आहेत.