विटा : टेंभू योजनेच्या ६ व्या टप्याचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम २ ऑक्टोबरऐवजी उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. शेतकरी, कार्यकर्त्यांनी या बदलाची नोंद घ्यावी तसेच हा कार्यक्रम विट्याच्या महात्मा गांधी विद्यामंदिरच्या मैदानावर होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी दिली आहे.
स्व. आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न असलेल्या टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामांचा प्रारंभ येत्या १ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने विट्यात मोठा शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. याबाबत बाबर म्हणाले, टेंभू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी स्व. आमदार बाबर यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे काम मार्गी लागून वर्कऑर्डर निघाली आहे. १ ऑक्टोबर रोजी सहाव्या टप्प्याच्या सुळेवाडी येथील कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य मंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होत आहे. यानिमित्ताने येथील साळ शिंगे रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यामंदिराच्या मैदानात मंगळवारी सकाळी १० वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या सहाव्या टप्प्यात सहा अ एक, सहा अ दोन आणि सहा ब अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे. या माध्यमातून खानापूर तालुक्यातील २८, आटपाडी तालुक्यातील १४ आणि तासगाव तालुक्यातील १२ गावांना पाणी मिळणार आहे. जवळपास १८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील गावांना मिळणारे पाणी मिळणार आहे. शिवाय खानापूर तालुक्यातील विटा, सुळेवाडी, गुंफा, गार्डी, भांबर्डे, वासंबे, घाडगेवाडी, कुर्ली, पारे, बामणी, चिंचणी, रेणावी, रेवणगाव, धोंडगेवाडी, ऐनवाडी, जखिनवाडी, जाधववाडी, गोरेवाडी, बलवडी (खा), खानापूर, पोसेवाडी, घोटी खुर्द, घोटी बुद्रुक, भडकेवाडी, पळशी, बाणूरगड, ताडाचीवाडी, कुसबावडे या गावांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील विभुतवाडी, गुळेवाडी, पिंपरी बुद्रुक, आंबेवाडी, बोंबेवाडी, पिंपरी खुर्द, खांजोडवाडी राजेवाडी, लिंगीवरे, पुजारवाडी, पांढरेवाडी, उंबरगाव, घरनिकी, कुरुंदवाडी तर तासगांव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील पाडळी, धामणी, हातनोली, हातनूर, नरसेवाडी, कचरेवाडी, किंदरवाडी, धोंडेवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे (दत्तनगर) या गावांचा समावेश आहे. काही गावांना पूर्वी टेंभूचे पाणी मिळत होते. मात्र केवळ फार कमी क्षेत्र ओलिताखाली येत होते. त्या गावातील बहुतांश क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न ६ व्या टप्प्यातील नवीन योजनेत करण्यात आला आहे. खानापूर तालुक्यातील पळशी गावातील तलावातून पळशी उपसासिंचन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. पळशी तलाव टप्पा क्रमांक ५ च्या गोरेवाडी कालव्यातून स्वतंत्र फिडरने भरला जाणार आहे. मतदारसंघातील साधारण ५४ गावांना लाभ मिळणार आहे. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यामधून खानापूर व तासगाव तालुक्यातील गावांना पाणी दिले जाणार आहे. कामथ वितरिकेमधून आटपाडी तालुक्यातील पुर्व भागातील गावांना पाणी दिले जाणार आहे. माण-खटाव वितरिका आटपाडी पश्चिम भागातील गावांना पाणी दिले जाणार आहे, असेही बाबर यांनी सांगितले आहे.