

सांगली : महात्मा गांधी चौक, तासगाव, जत, आष्टा आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडी, चेन स्नॅचिंग, जबरी चोरीचे 19 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. याप्रकरणी आठजणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 26 मोबाईलसह 35 लाख 25 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एलसीबीचे सहायक निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने बसस्थानक व त्रिमूर्ती गॅरेजजवळ तीन संशयितांना ताब्यात घेतले. रिजवान रफिक पठाण (वय 33), अल्ताफ रियाज नदाफ (23, दोघे रा. ख्वाजा वस्ती), प्रदीप चंद्रय्या प्रभू (30, रा. बेळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून 2 लाख 75 हजार रुपये किमतीचे 26 मोबाईल जप्त केले. मिरज रेल्वे स्थानक, एसटी स्टॅण्ड परिसरातून मोबाईल चोरल्याची कबुली तिघांनी दिली.
तुंग (ता. मिरज) गावाच्या हद्दीत एलसीबीच्या सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने गोपी ऊर्फ टावटाव तिरश्या काळे (22) व लेंग्या ऊर्फ तायल तिरश्या काळे (22, दोघे रा. ऐतवडे बुद्रुक) या दोघांना चोरीचे सोने विक्रीच्या तयारीत ताब्यात घेतले. दोघेही विना नंबरप्लेट दुचाकीवरून कारंदवाडी, तुंग गावात फिरत होते. दुचाकीबाबत विचारता मुक्या ऊर्फ विशाल भिमर्या पवार (रा. बहादूरवाडी), तोया पितांबर शिंदे (हुबालवाडी) व करण ऊर्फ करंजा रज्जा शिंदे (रा. बहादूरवाडी, ता. वाळवा) या तिघांनी कराडमधून ती चोरून आणल्याचे सांगितले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 7 लाख 20 हजाराचे 80 ग्रॅम सोन्याचे दागिने, 50 हजारांची दुचाकी व 10 हजाराचा मोबाईल असा 7 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यातील तिघे पसार आहेत, तर गोपी व लेंग्या काळे या दोघांना अटक केली आहे.
जत येथील सूतगिरणी चौकात एलसीबीच्या पथकाने सापळा लावून सागर चंदू साळुंखे (30, रा. उमराणी रोड, जत) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 6 लाख 27 हजार रुपयांचे 71.3 ग्रॅम सोन्याचे दागिने व 96 हजाराचे 924 ग्रॅम चांदीचे दागिने मिळून आले. त्याने साथीदार किसन ऊर्फ कल्ल्या चव्हाण, दिगंबर चव्हाण, रमेश चव्हाण यांच्या साथीने जत व कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. साळुंखे याला अटक केली असून अन्य तिघे पसार आहेत.
धामणी (ता. मिरज) येथील इरसेड भवन चौकात एलसीबीच्या पथकाने लोकेश रावसाहेब सुतार (31, रा. लिंगनूर, ता. मिरज) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 8 लाख 77 हजारांचे 98 ग्रॅम सोन्याचे दागिने व 58 हजार 900 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सुतार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली, कोल्हापूर, मुंबईसह कर्नाटकात घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
एलसीबीचे सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाने कुमठे फाटा येथे सोने विक्रीसाठी आलेल्या रोहन राजेंद्र चव्हाण (21, रा. संभाजीनगर, पंचवटी, अकलूज) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 6 लाख 20 हजाराचे सोन्याचे दागिने, 10 हजार 500 रुपयांची चांदीची देवाची मूर्ती जप्त करण्यात आली. तासगाव, आटपाडी, विटा, कुंडल, माळशिरस परिसरात त्याने दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार दुर्योधन कांतिलाल चोरमले (25, रा. गोंदी, ता. इंदापूर) हा पसार झाला आहे.