

सांगली : मद्यपान करून बस चालवल्यास संबंधित बस चालकावर राज्य परिवहन महामंडळाकडून बडतर्फीचीच कारवाई केली जाते. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षांत पाच बस चालकांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. सध्या एका चालकाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान संबंधित चालकाला निलंबित करण्यात येते, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
इतर वाहनामध्ये मद्य प्राशन करून वाहन चालवल्यास परवाना निलंबित करणे किंवा कायमस्वरूपी रद्द करणे, दंड आकारणे आदी प्रकारची कारवाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळाने मात्र मद्यपेयी चालकावरती कठोर कारवाई करण्यात येते. बसमधील प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलिस ब्रेथ अॅनालायझरद्वारे मद्यपानाची तपासणी करतात. एसटी बस चालकांनी दारू प्यायली आहे की नाही हे तपासण्यासाठी अल्कोहोल डिटेक्टर, ब्रेथलायझरचा वापर केला जात आहे. यामध्ये भूक मारून तपासणी केली जाते. राज्य परिवहन महामंडळाने मद्यपान केलेल्या चालकांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश दिले असून, अशा चालकांना सरळ बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला जात आहे. सांगली जिल्ह्यात अशा प्रकारणामध्ये तथ्य आढळल्याने तीन वर्षांत पाच जणांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील दहाही आगारांमध्ये चालकांना कामावर पाठवण्यापूर्वी वाहतूक नियंत्रक या उपकरणांच्या साहाय्याने चालकांची तपासणी करण्याची सोय आहे. सध्या ज्यांचा संशय येतो अशा चालकांची तपासणी होते. त्याचबरोबर अचानकपणेही चालकांची तपासणी करून दोषी आढळणार्यांची वैद्यकीय तपासणी करून रक्ताची चाचणी करण्यात येते.
संशय आल्यास प्रवाशांनी तक्रार करावी
एखाद्या बस चालकाने मद्य प्राशन केल्याचा संशय आल्यास प्रवाशांनी आगार व्यवस्थापक, किंवा कंट्रोलर अशा वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार करावी. अशा तक्रारींची तत्काळ दखल घेण्यात येऊन कारवाई केली जाते, असे आवाहन एस.टी. प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तो चालक निलंबित
इस्लामपूराहून कोडोलीकडे जात असताना बसला अपघात झाल्याने 18 प्रवासी जखमी झाले होते. बस चालकाचे रक्ताचे नमुने घेऊन ते कोल्हापूर लॅबला पाठवण्यात आले आहेत. सध्या त्याला निलंबित करण्यात आले असून, लॅबमधून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात होणार आहे.