

सांगली : शहरातील कल्पतरू मंगल कार्यालय ते रेल्वे स्टेशनकडे जाणार्या मार्गावर काल हिट अॅण्ड रनचा थरार पाहावयास मिळाला. मद्यधुंद मोटारचालकाने विरुद्ध दिशेने येत समोरून येणार्या चार ते पाच वाहनांना जोराची धडक दिली. या अपघातात चालकासह 12 जण जखमी झाले. यामध्ये तिघे गंभीर आहेत. दरम्यान, संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहनांची तोडफोड केली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यात जखमी झालेल्यांमध्ये मोटारचालक संतोष झवर (वय 51), तसेच पिडाण्णा मद्रासी (50), आयुष माने (9), अनिता खोकरे (40), अविनाश माने (45), अन्वी माने (5), नीलेश मिस्त्री (42), रेणुका मिस्त्री (39), स्वाती विश्वकर्मा (39), रिद्धी पिराळे (12), आरती माने (29) आणि राजेश पिराळेे (45) यांचा समावेश आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मोटारचालक संतोष झवर हा त्याच्या ताब्यातील मोटारीतून भरधाव वेगात कॉलेज कॉर्नर ते कल्पतरू मंगल कार्यालयाकडे जाणार्या मार्गावरून निघाला होता. यावेळी या चालकाने नशेत चुकीच्या दिशेने कार चालवून समोरून येणार्या प्रत्येक वाहनाला जोराची धडक दिली. यात काही मोटारी आणि दुचाकींचे नुकसान झाले, तर 11 जण जखमी झाले. कारची एअर बॅग उघडल्याने चालक बचावला. परिसरातील नागरिक तसेच वाहनधारकांनी कारचा पाठलाग करून चालकाला पकडले. यावेळी संतप्त झालेल्या जमावाने मोटारीची तोडफोड केली.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, चालकाच्या हिट अँड रनच्या थरारामुळे अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जखमींच्या नातेवाईकांनी सांगली शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.
मोटारचालकाला चांगलाच चोप
मोटारचालक संतोश हा मद्याच्या नशेत होता. त्याच्या मोटारीच्या धडकेत वयोवृद्धांसह लहान मुलेही गंभीर जखमी झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संतोष झवर याचा पाठलाग केला. त्यास पकडून चांगलाच चोप दिला. काही नागरिकांनी त्याच्या मोटारीवर दगडफेक केली.
जखमींत लहान मुलांचाही समावेश
मोटारीच्या धडकेत लहान मुलांसह 11 जण जखमी झाले. यामध्ये तिघे गंभीर आहेत. दोघांना डोक्याला मार लागला आहे, तर एका मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी मात्र झाली नाही.