

कडेगाव शहर : नेवरी (ता. कडेगाव) येथे गुंगीकारक अमली पदार्थ इंजेक्शनच्या 15 बाटल्यासह 10 लाखांचा मुद्देमाल कडेगाव पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी चौघा संशयितांना अटक केली आहे. रोहित हणमंत शिंदे (23, रा. शाहूनगर, विटा), राजू विठ्ठल हारुगुडे (23, रा. विवेकानंदनगर विटा), विशाल आनंदा चव्हाण 28, रा. नेवरी नाका, विटा), शुभम राजू भागवत (28, रा. विटा) अशी संशयितांची नावे आहेत.
ही कारवाई रविवार, दि. 27 रोजी सायंकाळी करण्यात आली. संशयितांच्या ताब्यातून पोलिसांनी गुंगीकारक अमली पदार्थ इंजेक्शनच्या 15 बाटल्या, चार मोबाईल, दोन मोटारी असा एकूण 10 लाख 1 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नेवरी येथे रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास विटा ते पुसेसावळी रस्त्यालगत पेट्रोल पंपाजवळ बंद पडलेल्या पोल्ट्रीशेजारी संशयित रोहित व राजीव यांच्या ताब्यातील पांढर्या मोटारीमधून (एमएच 09 डीएम 8085) विनापरवाना, गुंगीकारक व नशेच्या अमली इंजेक्शनच्या एकूण 15 सील बंद बाटल्या सापडल्या. त्या संशयित विशाल व शुभम यांना विक्री करण्यासाठी आणल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांवर कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, पोलिस हवालदार अमोल नायर करीत आहेत. चौघा संशयितांना कडेगाव पोलिसांनी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी संशयितांना बुधवार, दि. 30 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.