

सांगली : सांगली शहरात नशेसाठी वापरण्यात येणार्या ट्रेमीमाईड इंजेक्शनची विक्री करणार्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 2 लाख 15 हजार रुपयांची 558 इंजेक्शन्स आणि दुचाकी असा 2 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अशपाक बशीर पटवेगार (वय 51, रा. पत्रकारनगर, सांगली), यश संजय मोरे (26, रा. खणभाग, सांगली), ओंकार प्रकाश कुबसद (24, रा. गणेशनगर, सांगली), दिलीप विश्वनाथ बंडगर (रा. करोली टी, कवठेमहांकाळ), तेजस शंकर हेळवी (रा. नेलकरंजी, आटपाडी) आणि अविनाश हणमंत रणदिवे (रा. दिघंची, आटपाडी) यांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी, सांगलीतील पत्रकारनगर येथे एक व्यक्ती नशेसाठी वापरण्यात येणार्या ट्रेमीमाईड इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक नितीन सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार सावंत यांचे पथक तसेच अन्न व औषध प्रशासनच्या सहायक आयुक्त जयश्री सवदत्ती यांनी पत्रकारनगर येथे सापळा रचला. त्यावेळी अशपाक पटवेगार हा दुचाकीवरून एका पोत्यात ट्रेमीमाईड इंजेक्शन्स भरून घेऊन आल्याचे निदर्शनास आले. तातडीने सावंत यांच्या पथकाने छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, या इंजेक्शन्सचा नशेसाठी वापर केला जात असल्याची त्याने कबुली दिली.
त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने अन्य पाचजणांना या इंजेक्शन्सची विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पाचजणांवर छापा टाकून त्यांच्याकडूनही इंजेक्शन्सचा साठा जप्त करण्यात आला. ट्रेमीमाईड इंजेक्शनची नशेसाठी विक्री करून त्याचे रॅकेट चालविल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.