

विटा : निष्काळजीपणे भरधाव वाहन चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक दीपक सातप्पा रानमाळे (वय 40, रा. मांगेवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यास विटा न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पल्लवी सूर्यवंशी यांनी ही शिक्षा सुनावली. नऊ वर्षांपूर्वी हा अपघात झाला होता.
16 मे 2016 रोजी विट्याच्या मायणी रस्त्यावरील लकडे पेट्रोल पंपाजवळ एक कार आणि दोन मोटरसायकली यांच्यात अपघात झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील मांगेवाडी येथील दीपक रानमाळे हा कार चालवत भरधाव वेगाने मायणीकडून विट्याकडे येत होता. त्यावेळी समोरच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याची कार विरुद्ध दिशेला आली आणि राजेंद्र गणपती माळी (वय 45) व सूरज राजेंद्र माळी (वय 18, दोघेही रा. माहुली, ता. खानापूर, जि. सांगली) यांच्या दुचाकीला जोरदार धडकली.
तसेच नियंत्रण न झाल्यामुळे त्यामागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला कारने कट मारला. या दुसऱ्या दुचाकीवरील खानापूर तालुक्यातील देविखिंडी येथील जोडपे विशाल अशोक सवणे आणि पत्नी तेजस्विनी सवणे यांनाही जखमी केले होते. अपघातानंतर राजेंद्र आणि सूरज माळी यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातात तिन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले होते. याबाबत विटा पोलिसांमध्ये 17 मे 2016 रोजी उपनिरीक्षक संभाजी सिध्दू महाडिक यांनी फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर विटा न्यायालयात चालक दीपक रानमाळे याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी अभियोक्ता म्हणून शारदा गायकवाड, तर विटा पोलिस ठाण्याचे हवालदार गणी पठाण यांनी कोर्ट पैरवी केली.