

सांगली : सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीवर मुंबई येथे महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. घोष आज-शनिवारी सांगलीच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्विकारण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे फेब्रुवारी 2025 मध्ये सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. पदोन्नतीवर बदलीमुळे त्यांना केवळ एक वर्ष एक महिन्याचाच कालावधी मिळाला. ‘सांगली पॅटर्न’अंतर्गत त्यांनी राज्यात आदर्शवत काम केले.
नवे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष हे सध्या धाराशिव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होते. ते मूळचे कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील असून, 2019 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी रायगड, गडचिरोली येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी यवतमाळ, धाराशिव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. ते गेल्या दोन वर्षापासून धाराशिव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होते. डॉ. मैनाक घोष यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार शनिवारी सांगलीचा पदभार स्विकारणार आहे.