Sangli News : दोडामार्ग तालुक्यात सुपारी पिकाला मोठा फटका

Sangli News
दोडामार्ग तालुक्यात सुपारी पिकाला मोठा फटका
Published on
Updated on

दोडामार्ग : तालुक्यातील सुपारी बागायतदार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि वातावरणातील बदलाचा मोठा फटका सुपारी पिकाला बसला आहे. सुपारीची मोठ्या प्रमाणात फळगळती होत असून अनेक बागांमध्ये तब्बल ५० टक्क्यांहून अधिक सुपारी गळून पडल्याने बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे.

दोडामार्ग तालुक्यात काजू आणि नारळ या पारंपरिक पिकांबरोबरच गेल्या काही वर्षांत सुपारी हे महत्त्वाचे नगदी पीक म्हणून उदयास आले आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सुपारीच्या बागा उभ्या केल्या आहेत. या पिकावर अनेक बागायतदारांचे संपूर्ण अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे तयार झालेली सुपारी मोठ्या प्रमाणात गळून पडत असल्याने बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, ‘कोळेरोग’ या रोगामुळे सुपारीची फळगळ होत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. अचानक वाढलेली उष्णता आणि त्यानंतर झालेला पाऊस यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सुपारीच्या झाडांवरील तयार फळे मोठ्या प्रमाणात गळून पडत आहेत. या नुकसानीमुळे सुपारी बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून बागायतदारांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news