

जत : जत तालुक्याला ‘देवभूमी जत’ असा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी क्रांतिदिनी रविवारी तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. ‘जत’ हे नाव तालुक्याची ऐतिहासिक ओळख, अस्मिता आणि स्वाभिमान असून, नामांतराऐवजी पाणी, रस्ते, रोजगार, सिंचन, शिक्षण आणि औद्योगिक विकासाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार ए. बी. धोडमाळ यांना निवेदन देण्यात आले.
मोर्च्यात माजी आमदार विक्रमसिंह सावंत, विलासराव जगताप, जिल्हा परिषद माजी सभापती तम्मनगौडा रवि-पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मन्सूर खतीब, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे, शिवसेनेचे नेते महादेव हिंगमिरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे अमित दुधाळ, बाबासाहेब कोडग, पंचायत समिती सदस्य प्रमोद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, रासपचे बंडू डोंबाळे आदी सहभागी होतेे.
माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, ‘जतचे नाव बदलण्याची जनतेची मागणी नसताना हा प्रस्ताव कशासाठी?’ तालुक्याला पशुवैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय आणि मूलभूत विकास कामांची गरज आहे. ‘आरटीओ कार्यालय, प्राणीसंग्रहालय आदी कामांची चर्चा केली जात आहे. मात्र, ही कामे जनतेच्या प्रमुख मागण्या आहेत का? प्राणीसंग्रहालयासाठी प्राणी देखील कुठून आणणार? तालुक्यात बी.एस्सी. कृषी महाविद्यालय व पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याला प्राधान्य द्या.
मोठ्या प्रकल्पांच्या नावाखाली खर्च वाढविला जात असून, कामांच्या अंदाजपत्रकावर टक्केवारीचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जत तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये एजंटगिरी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, जतचे नाव बदलण्याऐवजी तालुक्याचे त्रिभाजन, शिक्षणाच्या सुविधा, पाणी आणि रोजगाराच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. क्रांतिदिनी काढलेला हा मोर्चा केवळ सुरुवात असून, जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल.
पडळकरांनी आश्वासने पूर्ण केली का? : विक्रमसिंह सावंत
आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण झाली का?’ असा सवाल माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केला. ते म्हणाले, जतचे नामकरण करण्यापूर्वी इतिहासकार, जाणकार, ज्येष्ठ राजकीय पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनतेशी चर्चा केली का? केवळ स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हा नामकरणाचा मुद्दा पुढे आणला जात आहे. आम्हाला देवभूमी नको, म्हैसाळचे पाणी हवे. देवभूमी नको, चांगले रस्ते हवेत. युवकांना रोजगार मिळण्यासाठी एमआयडीसी हवी.
‘मतं जतची घ्यायची आणि देखरेख मंगळवेढा तालुक्याची करायची’
‘मतं जतची घ्यायची आणि देखरेख मंगळवेढा तालुक्याची करायची, असा उद्योग आमदारांनी सुरू केला आहे,’ अशी टीका जिल्हा परिषद माजी सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांनी आमदार पडळकर यांच्यावर केली. जत तालुक्यात एमआयडीसी उभारून दहा हजार युवकांना रोजगार देण्याचे, कुलाळवाडी येथे सूतगिरणी सुरू करण्याचे, तसेच उद्योगधंदे आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही, असे ते म्हणाले. विवेक कोकरे म्हणाले, जत आमची अस्मिता आहे. जतची भावना दुखावू नका. जतचा दुष्काळ हटवा.मन्सूर खतीब म्हणाले, निवडणुकीतील आश्वासने पूर्ण न झाल्याने अपयश झाकण्यासाठी ‘देवभूमी जत’चा मुद्दा आणला आहे.