

मिरज : मिरज शासकीय रुग्णालयातून बाळचोरीप्रकरणी आई कविता आलदर यांचे व त्यांच्या बाळाचे डीएनए चाचणीचे नमुने जुळले आहेत. यामुळे पोलिसांनी हस्तगत केलेले बाळ कविता यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा डीएनए अहवाल पोलिसांकडे प्राप्त झाला आहे.
महिन्याभरापूर्वी मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागातून तीन दिवसाचे पुरुष जातीचे नवजात अर्भक चोरून नेण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी सारा साठे (सध्या रा. सावळज, ता. तासगाव, मूळ रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) या महिलेस अटक करून तिच्याकडून चोरलेले बाळ हस्तगत केले होते. मात्र सारा हिने हे बाळ तिचेच असल्याचा कांगावा केला होता.
यामुळे हस्तगत केलेले बाळ कविता आलदर यांचेच असल्याचे निश्चित करण्यासाठी पोलिसांनी बाळ व मातेच्या डीएनए चाचणीचा निर्णय घेण्यात आला होता. शासकीय रुग्णालयात बाळ व माता दोघांचेही नमुने घेऊन तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. या तपासणीत माता व बाळाचे डीएनए नमुने जुळले असल्याने हा अहवाल सारा साठे हिच्याविरुद्ध पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
प्रशासनाने नियुक्त केलेल्या पाचजणांच्या चौकशी समितीने, रुग्णालयातून बाळ चोरून नेण्यास प्रसूती वॉर्डातील परिचारिकांना जबाबदार ठरविले आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार परिचारिकांवर कारवाईस संघटनेने विरोध केला आहे. परिचारिकांवर कारवाईसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे अहवाल पाठविण्यात आला, मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.