

सांगली : दिवाळी तोंडावर आल्यामुळे कर्मचारी, कामगार, अंगणवाडी सेविका, हमाल यांचे लक्ष आता बोनसकडे लागले आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी सहा हजार रुपये बोनस, तर साडे बारा हजार रुपये सण उचल जाहीर केल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. महापालिका कर्मचारी, सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र उचल रकमेवरच आहे.
औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना एक पगार बोनस, तर हमाल, माथाडी कामगारांना यावेळी अगदी पाच हजारापासून ते सव्वा लाख रुपये मिळणार असल्यामुळे ते खुशीत आहे. बहुतांशी ठिकाणी बोनसचे वाटपही झाले आहे. बांधकाम कामगारांच्या बोनसचा अद्याप निर्णय प्रलंबित आहे.
बोनससाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. अखेर शासनाने दोन दिवसापूर्वी त्यांना सहा हजार रुपये बोनस जाहीर केला. याचा सांगली जिल्ह्यातील 3 हजार 700 कर्मचाऱ्यांना लाभ झाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस महिन्यापूर्वीच जाहीर झाला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बोनस मात्र वीस वर्षापूर्वीच बंद केला आहे. उत्पादन करणाऱ्या क्षेत्राला बोनस असतो, या सबबीखाली सरकारी कर्मचाऱ्यांचा बोनस बंद करण्यात आला आहे. सध्या त्यांना दहा ते बारा हजार रुपयांची उचल दिली जाते. ती सहा, सात महिन्यांमध्ये पगारातून कपात केली जाते.
महापालिका कर्मचाऱ्यांनाही पंधरा वर्षापूर्वीपासून बोनस बंद करण्यात आला आहे. याचा फटका सुमारे दोन हजार कामगारांना बसला आहे. त्यांना सुमारे दहा हजाराची उचल दिली जाते. सहा ते सात महिन्यांत ही रक्कम कपात करून घेतली जाते. यासाठी आता आंदोलन करणेही कर्मचाऱ्यांनी बंद केले आहे.