Chandrakant Patil : ऑनलाईन लॉटरी, वाशी मार्केट, जिल्हा बँक भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी लावणार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील : सांगलीत 1 रोजी इशारा सभा; जातीयवादाचा रावण जाळणार
Chandrakant Patil
पालकमंत्री चंद्रकांत पाटील
Published on
Updated on

सांगली : सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेत विरोधकांकडून अत्यंत विचित्र, विक्षिप्त, विकृत भाषणे झाली. त्याला उत्तर देण्यासाठी दि. 1 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सांगलीत इशारा सभा घेणार आहोत. विरोधकांच्या विकृत मनःस्थितीचा, जातीयवादाचा ‘रावण’ जाळण्याचा कार्यक्रम होईल. जयंत पाटील अर्थमंत्री असतानाचा ऑनलाईन लॉटरी घोटाळा, वाशी मार्केटमधील भ्रष्टाचार, ठाण्यातील बिल्डरची आत्महत्या, सांगली जिल्हा बँकेतील गैरकारभार आणि नोकरभरतीची चौकशी लावू, असा इशारा भाजप नेते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.

सांगलीत विश्रामबाग येथे गुरुवारी भाजपच्या जिल्हा ग्रामीण कार्यालयाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, सांगलीत विरोधकांनी महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेच्या निमित्ताने जो प्रकार केला, त्याला रिअ‍ॅक्शन नाही, पण उत्तर द्यावे लागेल. त्यासाठी सांगलीत दि. 1 रोजी सायंकाळी 5.30 वाजता इशारा सभा घेणार आहोत. त्या सभेत विरोधकांच्या भाषणाच्या क्लिपा दाखवणार आहोत. मला एकादशीला मटण खायला आवडेल, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यातून त्यांनी 18 लाख वारकर्‍यांची चेष्टा केली. ती क्लिप दाखवली जाईल. राष्ट्रवादीचे आ. अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथील सभेत काय भाषण केले होते? त्याला जयंत पाटील टाळ्या देत होते. ते मिटकरी आता आमच्याबरोबर बसतात. पण त्यावेळी ते कोणत्या पक्षात होते? जयंतरावांनी मिटकरींच्या बोलण्याला विरोध का केला नाही?

पडळकरांना ‘करेक्ट’ करू; पण..!

चंद्रकांत पाटील म्हणाले, आमदार पडळकर यांनी जे वाक्य वापरले, ते त्यांनी म्हणावे की नाही म्हणावे, याची चिंता महाराष्ट्राचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस करतील. ते तेवढे खंबीर आहेत. भल्या-भल्या माणसांना ते हाताळतात. ते पडळकर यांचा कान धरतील. मी प्रदेशाध्यक्ष असताना पडळकर यांनी सोलापूर येथील पत्रकार परिषदेत ‘शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोविडचा विषाणू आहे’, असे म्हटले होते. पत्रकार परिषद झाल्यानंतर फडणवीस यांनी पडळकर यांना फोन करून, ‘यापुढे शरद पवार यांना असे बोलायचे नाही’, असे सांगितले होते. पण इस्लामपुरात मिटकरींचा कान कोणी पकडला का? जयंतराव तर टाळ्या देत होते. गोपीचंद पडळकर काय बोलले, याचा स्वतंत्र विचार करू. त्यांना ‘करेक्ट’ करण्याची व्यवस्था आहे. पण पडळकर बोलले म्हणून फडणवीस यांच्यावर आगपाखड का?, असा सवाल पाटील यांनी केला.

आता शिंगावर घ्यायचे..!

पाटील म्हणाले, फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती दिल्या, 22 हजार गावांना जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणी दिले, ‘अटलसेतू’सारखे पूल निर्माण केले, पुणे, मुंबई, नागपूर येथे मेट्रो निर्माण केल्या, शेतीमालाला भाव दिला, ही त्यांची चूक झाली काय? फडणवीस यांच्यावर आगपाखड का? विरोधक सर्वजण एकत्र येऊन फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करतात, पण ते सहन केले जाणार नाही. यापुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आले की शिंगावर घ्यायचे आहे.

शाहू महाराजांचे नशीब चांगले, ते जिंकले

पाटील म्हणाले, संभाजीराजे यांना भाजपने खासदार केले. शरद पवार यांनी संभाजीराजे यांना आमदारकी तरी दिली का? कोल्हापूरचे शाहू महाराज यांना पडतील अशा ठिकाणी लोकसभेची उमेदवारी दिली. पण नशीब त्यांचे, ते वाचले आणि जिंकले. संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्यांनी पक्षाच्या कार्यालयात येणे, पक्ष सदस्यत्व स्वीकारणे हे योग्य दिसणार नाही, त्यामुळे त्यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर संधी दिली. ही भाजपची संस्कृती आहे. छत्रपतींना भाजप सन्मान देतो. शरद पवारांनी संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवले नाही. त्यांनी फक्त रोहित पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांचा विचार केला.

बिल्डरच्या डायरीत नेत्याचे नाव..!

पाटील म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या बिल्डरच्या डायरीत एका नेत्याचे नाव होते. त्यावेळी कोण रात्री तीन-तीन वाजेपर्यंत फडणवीस यांच्या घराबाहेर बसत होता? त्या आत्महत्या प्रकरणातील डायरी अद्याप नष्ट झालेली नाही. या सर्व प्रकाराची चौकशी लावू. वाशी मार्केटच्या भ्रष्टाचाराची चौकशी लावू. त्यासाठी प्रसंगी मी उपोषण करेन. जयंत पाटील अर्थमंत्री असताना झालेल्या ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याचीही चौकशी सुरू करावी लागेल, असेही ते म्हणाले.

पृथ्वीराज पवार यांना ‘दम’..!

पाटील म्हणाले, सर्वोदय कारखाना कोणी लाटला? त्याविरोधात पृथ्वीराज पवार व गौतम पवार गेली 20 वर्षे लढा देत आहेत. देवेंद्र फडणवीस व मी त्यांच्या पाठीशी आहोत. सर्वोदय कारखानाप्रकरणीही चौकशी होऊद्या. दि. 1 ऑक्टोबर रोजीच्या इशारा सभेला पृथ्वीराज पवार यांनी 5 हजार लोक आणावेत, नाही तर जयंत पाटील यांच्याविरोधात नुसते नाटक म्हणून तुम्ही बोलताय, असे मी समजेन. सर्वोदय कारखाना परत मिळवण्यासाठी दिलेला वकीलही काढून घेईन, असा प्रेमळ दमही त्यांनी पृथ्वीराज पवार यांना दिला.

बापूंच्या पुतळ्याला नमस्कार करा; जयंतरावांच्या भ्रष्टाचारावर बोला

चंद्रकांत पाटील म्हणाले, आमदार पडळकर यांचे डोके जरा गरम आहे. त्यांनी आता ‘डोक्याने’ चालावे. राजारामबापू यांच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटील यांच्या भ्रष्टाचारावर बोलायचे. त्यांचे कारखाने किती, त्यांचे गाळप किती, त्यांचे मोलॅसिस कुठे जाते, यावर बोला. त्याचे आकडे बाहेर काढा.

शरद पवारांनी जातीयवाद निर्माण केला

पाटील म्हणाले, एका कार्यक्रमात कोणी तरी शरद पवार यांना पुणेरी पगडी घालायला दिली. पण त्यांनी ती घातली नाही. ‘ज्योतिबा फुले यांची पगडी द्या’, असे ते म्हणाले होते. पुणेरी पगडी आणि फुले पगडी म्हणजे काय? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे सदस्य केले. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले की, ‘आता पेशवे राजे ठरवणार का?’ या वाक्याचा अर्थ काय? जातीयता कोणी निर्माण केली?

माझे मंत्रिपद काढून घ्या, मी उपोषणाला बसतो : चंद्रकांत पाटील

सांगली जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षांनी विक्षिप्त, विकृत भाषण केले. सांगली जिल्हा बँकेच्या गैरकारभाराची चौकशी लागलीच पाहिजे. चौकशी लागेपर्यंत मी उपोषणाला बसतो. मंत्री असल्याने आंदोलनाला अडचण येत असेल, तर काही दिवस माझे मंत्रिपद काढून घ्या, मी आमदार म्हणून उपोषणाला बसतो. पण आता सोडणार नाही. जिल्हा बँकेच्या नोकरभरतीचीही चौकशी झाली पाहिजे. पुरेसे तारण नसताना केलेल्या कर्जवाटपाचीही चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news