‘शक्तिपीठ’वरून पालकमंत्री-शेतकर्‍यांत वादावादी

ताफा अडवला; चर्चेला वेळ दिला नसल्याने शेतकरी झाले संतप्त
Sangli News
सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर शेतकरी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात वादावादी
Published on
Updated on

सांगली : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकर्‍यांना चर्चेसाठी वेळ न दिल्याच्या निषेधार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पालकमंत्री आणि शेतकर्‍यांमध्ये वादावादीही झाली. या महामार्गाला मूठभर शेतकर्‍यांचा विरोध आहे, असे पालकमंत्र्यांनी सुनावले, तर हजारो शेतकर्‍यांनी याला हरकती घेतली आहे, प्रसंगी रक्तसांडू मात्र एक इंच जमीन देणार नाही, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला. घोषणाबाजी सुरू असतानाच पालकमंत्री निघून गेले.

शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी गुरुवारी महाराष्ट्र दिनी शेतकर्‍यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्री थेट विविध बैठकांना उपस्थित राहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. यावेळी शेतकर्‍यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवा, असा संदेश त्यांना पाठवला. मात्र त्यांना वेळ मिळाला नाही. त्यानंतर काही वेळाने पालकमंत्री पाटील यांचा वाहनाचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जाऊ लागला. यावेळी गेटवरच शेतकर्‍यांनी त्यांचा ताफा अडवला. यानंतर शेतकरी आणि पालकमंत्र्यामध्ये वादावादी सुरू झाली. या महामार्गाला काही मूठभर शेतकर्‍यांचा विरोध आहे. मोठ्या संख्येनी या महामार्गाला शेतकर्‍यांनी पाठिंबा दिला आहे, असे म्हणताच शेतकरी संतप्त झाले. याला हजार शेतकर्‍यांनी हरकती घेतल्या आहेत. शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ रद्द न केल्यास हातात बंदुका घेऊ, प्रसंगी हातात शस्त्र घेऊ, एकही इंच जमीन देणार नाही, अशी त्यांनी घोषणाबाजी सुरू केली, अशा गोंधळातच पालकमंत्री निवेदन स्वीकारून तेथून निघून गेले.

पालकमंत्री पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शक्तिपीठ महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर महामार्गाला समांतरच आहे. रत्नागिरी-नागपूर रस्त्यावर वाहनांची गर्दीही नाही. आवश्यक तेवढा टोल त्या रस्त्यावर गोळा होत नाही. मग हा महामार्ग बनवण्याचा घाट कशासाठी होतोय. शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यावरणाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, तसेच वारणा, कृष्णा नदी काठावरील गावांतून हा महामार्ग जाणार असल्याने महामार्गासाठी पडलेल्या भरावामुळे तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यामुळे पुराचा प्रचंड मोठाधोका निर्माण होणार आहे. हजारो एकर बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे, तसेच अनेक शेतकरी भूमिहीन, बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे कुणाचीही मागणी नसलेला कुणाच्याही हिताचा नसलेला, रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा हा शक्तिपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे. यासाठी आता लढा तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्ष, नागपूर - गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने घेण्यात आला आहे. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, शरद पवार, घनश्याम नलावडे, भूषण गुरव, विष्णू सावंत, राहुल जमदाडे, अमर शिंदे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news