

कसबे डिग्रज : गेल्या दोन वर्षापासून सांगली-पेठ मार्गाचे काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र सांगली-पेठ मार्ग डिग्रजजवळील प्रस्तावित टोल नाका टप्प्यातील एक किलोमीटर रस्त्यावर धूळ, दलदल, खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज अपघात घडत आहेत. प्रशासन, रस्ते विभागाने तत्काळ रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.
कसबे डिग्रज येथे प्रस्तावित टोल नाक्यासाठी जमीन संपादनातील विस्कळीतपणामुळे जवळपास एक किलोमीटर रस्ता रखडला आहे. याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अपघात घडत आहेत. धुळीवर उपाय म्हणून दिवसातून दोनदा पाणी मारण्याचे अधिकार्यांनी कबूल केले होते, पण कार्यवाही शून्य. सर्वच विभागाच्या अधिकार्यांची व शेतकर्यांची एकत्रित बैठक आठ दिवसापूर्वी सांगलीत झाली. शेतकर्यांनी भूसंपादन, राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर विभागाच्या अधिकार्यांना जाब विचारले. पण त्यांना ठोस माहिती देता आली नाही. राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी, प्रांताधिकारी उपस्थित असतानाही बैठक निष्फळ ठरली. अवघ्या 41 किलोमीटरच्या रस्त्यासाठी टोल नाका हवाच कशाला? असे सवाल केले जात आहेत.
प्रस्तावित टोल नाक्याच्या एक किलोमीटर अंतरात शेतकर्यांनी काम अडवले आहे. 15, 22 आणि 24 मीटर या वादात काम रेंगाळले आहे. शेतकर्यांनी याप्रश्नी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे व लोकप्रतिनिधींनी याबाबत तोडग्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली, बैठका झाल्या. मात्र काहीच निष्पन्न झाले नाही.