

पलूस ः पलूस-कराड-तासगाव महामार्ग ते श्रमिक भवन, किर्लोस्करवाडी हा प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमय बनला आहे. रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यातील खड्ड्यांमुळे दररोज अपघातांची मालिका सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, अशी भावना वाहनधारकांतून व्यक्त होत आहे. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
पलूस, किर्लोस्करवाडी, सावंतपूर, रामानंदनगर, नागराळे, पुणदी, बुर्ली, दुधोंडी या गावांना जोडणारा व किर्लोस्करवाडी औद्योगिक क्षेत्र आणि रेल्वेस्थानकाला जोडणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याच्या दुतर्फा औद्योगिक कंपन्या, शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे कामगार, विद्यार्थी, व्यापारी आणि सामान्य नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. मात्र सध्या पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत आहे. परिणामी खड्ड्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे वाहने जोरात आदळत आहेत. अपघातही होत आहेत. अनेक नागरिक अपघातग्रस्त होऊन गंभीर दुखापतीही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. या रस्त्यावर मोठी जीवित हानी होण्यापूर्वी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.