

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल न करता काँग्रेस-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आघाडीने माघार घेतली. त्यामुळे महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या विशेष सभेत होईल. दरम्यान, काँग्रेसने न लढता भाजपला बाय दिला, अशी चर्चा आणि तर्क-वितर्क राजकीय गोटात चांगलेच रंगले आहेत.
महापौर, उपमहापौर पदासाठी 10 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार होती. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत होती. महापौरपदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी यांचे नाव निश्चित होते. भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथील एका हॉटेलमध्ये भाजप नगरसेवक व भाजप शहर जिल्हा कोअर कमिटी नेत्यांच्या उपस्थितीत महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी यांचे नाव जाहीर केले. यावेळी आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जयश्री पाटील, भाजपचे नेते दीपक शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, सुरेश आवटी प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, गटनेते मैनुद्दीन बागवान, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी व राष्ट्रवादीचे नगरसेवकही यावेळी उपस्थित होते.
उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून गजानन मगदूम यांचे नाव जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सकाळी 10 वाजता शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांना मगदूम यांचे नाव कळवले. महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व नगरसेवक बुधवारी दुपारी बारा वाजता महापालिकेत दाखल झाले. धीरज सूर्यवंशी यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सूर्यवंशी यांनी चार अर्ज दाखल केले. त्यानंतर उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांनी अर्ज दाखल केला. त्यांनी दोन अर्ज दाखल केले. भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची युती झाल्याने त्यांचे महापालिकेतील संख्याबळ 55 पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे युतीचे नेते, कार्यकर्ते यांच्यात उत्साह होता. विजयाची औपचारिकता केवळ बाकी होती.
काँग्रेसकडून पाटील, कदम अर्ज भरणार, पण...!
महापौर, उपमहापौर पदासाठी विरोधी काँग्रेसकडून कोण उमेदवारी अर्ज भरणार, याकडे लक्ष लागले होते. खासदार विशाल पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्यात चर्चा सुरू होती. खासदार पाटील यांच्या साई बंगल्यावर काँग्रेसचे नगरसेवक एकत्र आले. कोणाचा अर्ज भरायचा, अर्ज भरायचा की नाही, यावर चर्चेची गुऱ्हाळे सुरू होती. दरम्यान, महापौर पदासाठी काँग्रेसकडून मयूर पाटील आणि उपमहापौर पदासाठी अश्विनी कदम यांचा उमेदवारी अर्ज भरण्याबाबत चर्चा झाली. मात्र उमेदवारी अर्ज भरायचा की नाही, याबाबत नेत्यांचा निर्णय होत नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी 3 वाजता संपणार होती. मात्र अडीच वाजले तरी काँग्रेसचा निर्णय होत नव्हता. राष्ट्रवादीनेही आपल्याकडे केवळ तीन नगरसेवक असल्याकडे लक्ष वेधत अंग काढून घेतले. अखेर दुपारी 3 वाजले. काँग्रेसकडून महापौर, उपमहापौरपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी त्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. भाजपला जणू काँग्रेसने बाय दिला, अशी चर्चा सुरू होती.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अशी आघाडी झाली होती, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने या आघाडीशी अघोषित समझोता करून निवडणूक लढवली होती. शिवसेनाही स्वतंत्रपणे लढली होती. निवडणुकीत भाजपला 39 जागा मिळाल्या. भाजपचे बहुमत अवघ्या एका जागेने हुकले. काँग्रेसला 18, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3, तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. निवडणुकीनंतर महापौर-उपमहापौर पदासाठी भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष अशी युती झाली आहे. या युतीचे संख्याबळ 55 पर्यंत पोहोचले आहे.
सव्वा वर्षाचा फॉर्म्युला?
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महापौर पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा-दहा महिन्यांचा कालावधी न करता दोनच टप्पे करावेत, असे सुचवले आहे. त्यानुसार सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिकेबाबत काळाच्या ओघात ठरवू. आताच सर्वकाही ठरवण्याची गरज नाही. दुसऱ्या टप्प्यात कोणाची वर्णी लागणार, हे त्या-त्या वेळी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
पराभवाचे शल्य दूर केले : पालकमंत्री
धीरज सूर्यवंशी यांना गेल्या टर्ममध्ये उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापतीपद दिले असताना, पुन्हा महापौर पदासाठी का निवडले याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्यावेळी महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षातल्या सहा जणांनी बंडाळी केल्याने पक्षाचे महापौरपदाचे अधिकृत उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा पराभव झाला होता. त्याचे शल्य पक्षाला होते. त्यामुळे त्यांना संधी दिली आहे. स्थायी समिती तसेच इतर समित्यांच्या सभापती निवडीबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. त्याला थोडा वेळ लागेल. ज्या-त्या वेळी ठरेल.
पालकमंत्र्यांची शिष्टाई की मास्टरस्ट्रोक
महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे तगडे बहुमत आहे. तेव्हा विरोधाला विरोध न करता काँग्रेसने महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लढवू नये. निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याअनुषंगाने त्यांनी काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम यांच्याशी चर्चा केल्याचेही भाजपच्या काही नेत्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल न करणे ही पालकमंत्र्यांची शिष्टाई की मास्टरस्ट्रोक, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होती.
शिवसेनेने पाठ फिरवली..!
महापालिकेच्या सत्तेत शिवसेनेला बरोबर घेणार आहोत. त्यांना कोणते पद द्यायचे, याबाबत बोलणी सुरू असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मात्र बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित युतीच्या बैठकीला शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता. शिवसेनेचे नगरसेवकही उपस्थित नव्हते.