‘वाकुर्डे’चे सर्व टप्पे पूर्ण करणार : देवेंद्र फडणवीस

Maharashtra Assembly Election : जयंतरावांनी 15 वर्षांत फुटकी कवडीही दिली नाही; शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करणार
Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
Published on
Updated on

इस्लामपूर ः जयंत पाटील यांनी 15 वर्षे मंत्री असूनही वाकुर्डे-बुद्रुक योजनेसाठी फुटकी कवडीसुध्दा दिली नाही. आम्ही मात्र 100 कोटींनी सुरुवात केली. आता 45 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आणणार्‍या ‘वाकुर्डे’चे सर्व टप्पे पूर्ण करण्याचा शब्द नव्हे, तर वचन देतो, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पेठ (ता. वाळवा) येथे शुक्रवारी शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, सम्राट महाडिक, भगतसिंग नाईक, विक्रम पाटील, डॉ. प्रताप पाटील, सी. बी. पाटील, समित कदम, मच्छिंद्र सकटे, हणमंतराव पाटील, केदार नलवडे, अशोक पाटील, नंदकुमार पाटील, रणजितसिंग नाईक, दि. बा. पाटील, डॉ. सचिन पाटील, जयराज पाटील, संदीप पवार, के. डी. पाटील, जयकर कदम, राहुल पाटील, मोहन मदने आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, 1999 ते 2014 या आघाडी सरकारच्या काळात 15 वर्षे मंत्री असणार्‍या जयंत पाटील यांनी वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी फुटकी कवडी दिली नाही. आम्ही सत्तेवर आल्याबरोबर 100 कोटी दिले. त्यानंतरही निधी मंजूर करत आता वाकुर्डेचे सर्व टप्पे पूर्ण करणार आहे. सत्तेवर येताच येत्या मार्चपर्यंत या योजनेसाठी पूर्ण तरतूद करून 45 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा बार उडवून देतो. शिराळ्यातील भुईकोट किल्ल्यात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, शिराळा बस स्थानकाचा प्रश्न, एमआयडीसी विकसित करणे, तालुक्यातील रस्ते, अशा अनेक विकास कामांसाठी भरभरून निधी देऊ.

साखर कारखान्यांचा आयकर माफ; शेतकर्‍यांना पूर्ण कर्जमाफी

फडणवीस म्हणाले, राज्यातील कारखान्यांना 10 हजार कोटींचा आयकर माफ करण्यासाठी शरद पवार यांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे प्रयत्न केले. पण हात हलवत ते परत आले. आम्ही मात्र पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्याकडून आयकरमाफी करून घेतली. पुढील पाच वर्षे कृषी पंपांची वीज बिल माफी, 12 महिने रात्रं-दिवस वीज पुरवठा आणि शेतकर्‍यांना पूर्ण कर्जमाफी करून त्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन देत आहे.

सत्यजित देशमुख म्हणाले, वाकुर्डेचे पाणी बंदिस्त पाईपने देण्याची संकल्पना देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यामुळे ही योजना मार्गी लावण्यासाठी त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची आपली जबाबदारी आहे. शिराळा मतदारसंघात विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महाडिक बंधू माझ्या पाठीशी असल्याने या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे. सहकार अडचणीत आणून विरोधक माणसे फोडत आहेत.

सम्राट महाडिक म्हणाले, कार्यकर्त्यांची नाराजी होती, म्हणून मी अपक्ष अर्ज भरला. गद्दारी आमच्या रक्तात नाही. तुमचा आदेश मानून आता आम्ही सत्यजित देशमुखांच्या मागे राहिलो. आता परिवर्तन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. महायुतीची पुन्हा सत्ता आल्यानंतर वाकुर्डे बुद्रुक योजना लवकर मार्गी लागावी. यावेळी सुखदेव पाटील, मच्छिंद्र सकटे, सागर खोत, गणेश शेवाळे, उत्तम पाटील, दत्ताजी देसाई, जगन्नाथ माळी, संदीप जाधव, बाळासोा घेवदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

पाऊस अन् पवारांच्या सभेची आठवण...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे राहताच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे भाषणाची सुरुवात करतानाच ते म्हणाले, पावसात सभा घेतल्या की उमेदवार निवडून येतात, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा आपल्यासाठी शुभसंकेत आहे. पण पाऊस पडो अगर न पडो, आपणाला निवडणुकीत सत्यजित देशमुख यांना विजयी करायचे आहे.

सत्यजित देशमुख सुसंस्कृत नेतृत्व

यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी, बांधकाम कामगार, 12 कोटी जनतेसाठी महात्मा फुले मोफत आरोग्य योजना, आशा वर्कर्स, पोलिस पाटील यांना मानधन वाढ, अशा अनेक योजनांमधून झालेल्या लाभाची माहिती दिली. या सर्व योजना सुरू ठेवण्यासाठी व या परिसरातून 25 हजार लखपती दीदी निर्माण करण्यासाठी सत्यजित देशमुख यांच्या पाठीशी राहा, असे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्याप्रमाणेच सत्यजित देशमुख हे सुसंस्कृत नेतृत्व असून सम्राट महाडिक हे त्यांच्या पाठीशी ठामपणे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news