द्राक्षांना दर चांगला; पण माल कुठाय?
प्रवीण जगताप
लिंगनूर : यंदा जिल्ह्यात प्रतिवर्षीप्रमाणे कवठेमहांकाळ व मिरजपूर्व भागात द्राक्ष हंगामास मागील वीस दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. मिरजपूर्व भागातील संतोषवाडी, खटाव, बेळंकी, कवठेमहांकाळ तालुक्यातील, कोंगनोळी, शिंदेवाडी आदी भागात 361 ते 400 रुपये पेटी म्हणजेच प्रति चार किलो असा दर मिळत आहे. असा दर मिळत असला तरी यंदा एप्रिलमधील वाढलेले तापमान, पोंगा, फ्लॉवरिंग स्टेजमधील पाऊस, पावसामुळे कूज, गळ अशा विविध कारणांमुळे उत्पादनात 50 ते 70 टक्के घट आली आहे. परिणामी उत्पन्नातही तितकीच घट आली आहे. त्यामुळे द्राक्षांना दर चांगला, पण माल कुठे आहे? असा प्रश्न आहे.
यंदाही उत्पादनातील झालेल्या या घटीमुळे द्राक्ष उत्पादक पुन्हा सलग चौथ्या वर्षी आर्थिक संकटात सापडला आहे. 2020 -21 पासून कोरोना जागतिक आपत्तीला सुरुवात झाली. नको त्यावेळी पडणारा पाऊस आणि रोगांचा प्रादुर्भाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घसरलेले दर. त्यामुळे 2024 आले तरी द्राक्षशेतीवरील संकटे संपलेली नाहीत.
जिल्ह्यात जवळपास आठ तालुक्यांमध्ये द्राक्षांची शेती केली जाते. मात्र 2021पासून द्राक्षशेतीला घसरणारे दर आणि घटणारे उत्पादन याचा फटका यामुळे प्रतिवर्षी शेतकरी द्राक्षबागा काढून टाकत आहेत. त्यामुळे 10 ते 20 टक्के द्राक्षक्षेत्रात घट होत आहे. ऐन हंगामात शंभर रुपये प्रति चार किलो इतका दर घसरला जातो. दर कमी मिळाल्यामुळे खर्चही निघत नसल्याने व डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत असल्याने क्षेत्रात घट होत आली आहे. पुन्हा यावर्षी आणखी द्राक्षशेती घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यंदाच्या द्राक्ष उत्पादनाबाबत शेतकर्यांशी चर्चा केली असता, कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील प्रगतशील अभ्यासू शेतकरी अशोक बेडगे म्हणाले, कोंगनोळी व परिसरातील द्राक्षबागेत यंदा मालच पडला नाही. एकरी उतारा अत्यंत कमी आहे. उत्पादन कमी आहे. त्यामुळे सुरुवातीचे हे चांगले दिसणारे दर, मालच नसल्याने कुचकामी ठरले आहेत. यंदाही फुलोरा व पोंगा स्टेजमध्ये रोग, द्राक्षघडातील कूज, गळ या विविध कारणांमुळे द्राक्ष घडांना वजन नाही. उत्पादनातही मोठी घट झाली आहे. एकरी उतारा कमी पडत आहे. तोट्यामुळे आमच्या भागात पुढील वर्षी पुन्हा द्राक्ष क्षेत्रात घट होणार आहे. सध्या गावातील द्राक्षांना 361 ते 400 रुपयेपर्यंत प्रति चार किलोस दर मिळाला आहे. परंतु उत्पादनात 70 टक्के घट झाल्याने चांगला दर असूनही द्राक्षबागेचा खर्च भागत नाही. परिणामी द्राक्षशेती यंदाही तोट्यातच गेली आहे.

