

आटपाडी/शेटफळे : शेवटच्या घटकाला पाणी मिळेपर्यंत तीव्र लढ्याचा निर्धार करत तातडीच्या उपाययोजनांसह टेंभू योजनेला पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव देण्याची मागणी शेटफळे (ता. आटपाडी) येथे पाणी परिषदेत करण्यात आली. शेतमजूर, कष्टकरी - शेतकरी संघटना, पाणी संघर्ष चळवळीच्यावतीने तेरा दुष्काळी तालुक्यातील जनतेची 33 वी पाणी संघर्ष परिषद गुरुवारी झाली. अध्यक्षपदी प्रा. शिवाजीराव काळुंगे तर निमंत्रक वैभव नायकवडी होते.
परिषदेत 20 ठराव केले. ते लवकरच शासन दरबारी सादर करण्यात येणार आहेत. लढा अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धार पाणी संघर्ष चळवळीचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, सुभाष पाटील, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. बाळासाहेब नायकवडी, गौरव नायकवडी, आनंदराव पाटील, महादेव देशमुख, विष्णुपंत पाटील, चंद्रकांत गायकवाड, डॉ. सयाजीराजे मोकाशी, पतंगराव गायकवाड, सावंता पुसावळे उपस्थित होते.
वैभव नायकवडी म्हणाले, अनेक गावे टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यांच्या समावेशासाठीही लढा दिला जाईल. निधीच्या अभावामुळे योजना अर्धवट राहिल्या असून, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी तेरा दुष्काळी तालुक्यांच्या पाण्यासाठी लढा दिला. त्यामुळे टेंभू योजनेला त्यांचे नाव देणे हा त्यांच्या योगदानाचा योग्य सन्मान ठरेल. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, टेंभू योजनेचे मागील आवर्तन महिनाभर उशिरा मिळाल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले. ते पुन्हा होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने आणि चळवळीचा कार्यकर्ता म्हणून शासन दरबारी आवाज उठवत राहीन, अशी ग्वाही दिली. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आनंदराव पाटील, प्रा. आर. एस. चोपडे, बाळासाहेब नायकवडी, विष्णुपंत चव्हाण, शिवाजीराव पाटील, चंद्रकांत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
टेंभू योजनेचे पाणी आल्यानंतर शेतीमध्ये जिद्दीने आणि कष्टाने यशस्वी झालेल्या शेटफळे व आटपाडी तालुक्यातील शेतकर्यांचा पाणी परिषदेत गौरव करण्यात आला
क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पश्चात वैभव नायकवडी यांनी पाणी चळवळीची धुरा समर्थपणे सांभाळली. आता अण्णांचे नातू युवा नेते गौरव नायकवडी यांनी पाणी परिषदेत हजेरी लावत लढा सुरू राहील, अशी ग्वाही दिली. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख आबा यांनी चळवळीचे नेतृत्व केले. चंद्रकांत देशमुख यांनी सक्रिय सहभाग घेतला, तर आबांचे नातू आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पाणी प्रश्नावर आवाज उठवण्याचे संकेत दिले.