

वाळवा : हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी कुटुंबीय व निकटवर्तीयांच्या माध्यमातून खासगी कंपन्या स्थापन करून कारखान्यासह इतर संस्थांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका दिल्याचा गंभीर आरोप केदार नायकवडी यांनी केला आहे. या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कारखान्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा आणि कर्जाची जबाबदारी स्वतः घ्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी ज्येष्ठ नेते किरण नायकवडी, संचालक गौरव नायकवडी व केदार नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली साखर शाळेसमोर सोमवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी केदार नायकवडी यांनी वैभव नायकवडी यांच्याशी संबंधित विविध खासगी कंपन्यांचा तपशील सार्वजनिक केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘ॲग्री नित्यम’ ही कंपनी 2017 साली अवघ्या 50 हजार रुपयांच्या भांडवलावर कोल्हापूर येथे स्थापन झाली. मात्र, स्थापनेनंतर अल्पावधीतच कंपनीची उलाढाल वेगाने वाढत जाऊन अवघ्या सात वर्षांत तब्बल 2,638 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. या निधीचा स््राोत काय, याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, हुतात्मा बझारमार्फत या कंपनीला सुमारे 92 कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कंपनीच्या माध्यमातून कारखान्याची साखर कमी दरात खरेदी करून कोट्यवधींचे नुकसान केल्याचेही त्यांनी नमूद केले. ॲग्री नित्यमने सुमारे 11 लाख क्विंटल साखर खरेदी केल्याचा दावा करण्यात आला.
याशिवाय, कारखान्याला शासनाकडून मिळालेल्या 148 कोटी रुपयांच्या कर्जापैकी 20 कोटी रुपये कर्नाटकातील कोगनोळी येथील पतसंस्थेत बेकायदेशीररीत्या ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. वैभव नायकवडी यांनी हिंदू अविभक्त कुटुंब व्यवस्थेचा वापर करून कुटुंबीयांच्या नावावर कोळसा खाण, मेटाफिल्ड इंडस्ट्रीज, एस.बी. ॲग्रो कम्युनिटी, लेड एक्स्पर्ट प्रा. लि., यांसारख्या विविध कंपन्या स्थापन केल्याचेही केदार नायकवडी यांनी सांगितले. दरम्यान, हुतात्मा बझार प्रकरणाची चौकशी प्रक्रिया सुरू झाली असून संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांची न्यायालयीन चौकशी व्हावी, यासाठी कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात शंकर जाधव, सनी अहिर, संजय अहिर, उमेश कानडे, अरुण यादव, वसंत वाजे, स्नेहल नायकवडी, पंचायत समिती सदस्या प्राची अहिर, रूपाली पाटील, शाहिन वलांडकर, महादेव कांबळे, महादेव माने, बाजीराव मांगलेकर आदी सहभागी झाले होते.