

विटा : 'महाराष्ट्र केसरी' ही कुस्ती क्षेत्रातील सर्वात मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेची महत्ता (गरिमा) कायम राहण्यासाठी संघटनात्मक राजकारण दूर करून वर्षातून एकदाच ही स्पर्धा घ्यावी, या मागणीसाठी आपण येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत, अशी माहिती डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी शनिवारी (दि.१५) दिली.
यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेनंतर सुरू झालेला वाद अद्याप संपलेला नाही तरीही आता डिसेंबर महिन्यात पुन्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचे नियोजन वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. त्यामुळे एका वर्षात दोन-दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत. संघटनात्मक राजकारण करून दोन-दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणे, हे अत्यंत चुकीचे असून यामुळे या मानाच्या स्पर्धेचे महत्त्व कमी होत आहे, असे पाटील यावेळी म्हणाले.
यावर्षी झालेल्या कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ हा विजेते झाला आहे, असे ग्राह्य धरून आता पुढे आम्ही तयारी सुरू केली आहे. त्यात आम्हाला कोणतेही राजकारण आणायचे नाही. पंचगिरीत दोष असता कामा नये,एवढीच आमची भूमिका आहे. मात्र आता जे कुस्ती क्षेत्राच्या बाबतीत सुरू आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गरिमा कायम ठेवण्यासाठी त्यातील संघटनात्मक राजकारण दूर करावे. राज्य शासनाने संघटनांमध्ये योग्य समन्वय साधून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होईल यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे, यासाठी आमचे हे लाक्षणिक उपोषण असणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या आंदोलनानंतरही राज्य शासनाला जाग आली नाही, तर मुंबईमध्ये भव्य मोर्चा काढून ही मागणी केली जाईल, असा इशारा पै.पाटील यांनी दिला. दरम्यान, या आंदोलनात कुस्तीप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन ही त्यांनी केले. तसेच जर कोणाला एकापेक्षा अधिक महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यायच्या असतील तर किमान एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवावे, अशी आमची मागणी आहे, असा टोलाही डबल महाराष्ट्र केसरी पै. पाटील यांनी आयोजकांना लगावला.