

इस्लामपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वर्ग 3 कर्मचार्यांचा आकृतिबंध 30 डिसेंबर 2006 रोजी 18 वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर लोकसंख्या वाढीच्या तुलनेत आरोग्य कर्मचार्यांची संख्या वाढली नाही. त्यामुळे अपुर्या मनुष्यबळावर चालणार्या आरोग्य यंत्रणेला मर्यादा येत आहेत. महायुती सरकारने आरोग्य विभागातील वर्ग तीन कर्मचार्यांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करावा, अशी हिवताप कर्मचारी महासंघाकडून मागणी होत आहे.
नवीन महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांना आरोग्य सेवेकरिता शासनाने मंजुरी दिली. मात्र तिथे पुरेशा प्रमाणात कायमस्वरूपी नवीन पद निर्मिती करण्यात आली नाही. त्याचे गंभीर परिणाम रुग्णांना भोगावे लागत आहेत.
बदलत्या हवामानामुळे हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका, हत्तीरोग, तसेच इतर जलजन्य आजार वाढत आहेत. या सर्वांवर प्रभावीपणे सर्वेक्षण करणारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाकडे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र शासनाने क्षयरोगमुक्त अभियान, कुष्ठरोग निवारण अभियान, मिशन इंद्रधनुष्य अभियान, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग व कीटकजन्य रोग निर्मूलन अभियान, अशी जवळपास 30 हून अनेक आरोग्य योजनेची अंमलबजावणी केली जाते. मात्र ही राबविण्यात येणारी यंत्रणा अत्यंत तोकडी आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येणार्या कर्मचार्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा ठराव शासनाकडे प्रलंबित आहे. हिवताप विभागातील जवळपास 30 हून अधिक जिल्ह्यांचा कारभार प्रभारी अधिकारी यांच्याकडून सुरू आहे. अनेक तालुक्यांतील आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य निरीक्षक व आरोग्य कर्मचारी पदे रिक्त आहेत. याबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सांगली जिल्हा दौर्यावर असताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांनी याबाबत राज्यपाल महोदयांची भेट घेतली होती. कोरोना काळात झालेल्या शासकीय आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा लक्षात घेता मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी लक्ष द्यावे, अशी नागरिक व हिवताप कर्मचारी महासंघाकडून मागणी होत आहे.
तत्कालीन ग्रामसेवक- ग्रामपंचायत अधिकारी - सुरुवातीला वेतन- एस 8 वेतनश्रेणी 25500 ते 81100, दहा वर्षांनंतर मिळणारी वेतनश्रेणी- एस 14 वेतनश्रेणी- 38600 ते 122800 विस्तार अधिकारी दर्जा. 20 वर्षांनंतर मिळणारी वेतनश्रेणी- एस 15 वेतनश्रेणी 41800 ते 132300 सहायक गटविकास अधिकारी दर्जा. 30 वर्षांनंतर मिळणारी वेतनश्रेणी-एस 20 वेतनश्रेणी 56100 ते 177500 गटविकास अधिकारी. आरोग्य सेवक- आरोग्य सेवक-एस 8 वेतनश्रेणी 25500-81100, एस 9 वेतनश्रेणी 26400-83600, एस 13 वेतनश्रेणी 35400 ते 112400, एस 14 वेतनश्रेणी 38600 ते 122800.