Sangli News : दिल्लीच्या व्यापाऱ्यास २४ कोटी दंड

रामानंदनगर पत्त्यावर बोगस फर्म; १२ कोटींचा जीएसटी घोटाळा
GST officers bribery
GST officers briberyPudhari
Published on
Updated on

सांगली : पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील बनावट पत्त्यावर जीएसटी नोंदणी करून सुमारे ७० कोटी रुपयांची बोगस बिले काढून १२ कोटींचा आयटीसी गैरवापर केल्याप्रकरणी केंद्रीय वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाच्या कोल्हापूर आयुक्तालयाने दिल्लीतील गोविंदसिंग नामक व्यापाऱ्यास २४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. यामध्ये बनावट करचलने तयार करून इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) पुढे पास केल्याबद्दल १२ कोटी रुपये, तर त्याच बनावट बिलांच्याआधारे स्वतः आयटीसीचा लाभ घेतल्याबद्दल आणखी १२ कोटी, असा एकूण २४ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

दिल्लीच्या गोविंदसिंग नामक व्यापाऱ्याने रामानंदनगरमधील रामरहीम चौक येथील पत्त्यावर ‘एस. आर. मेटल’ या नावाने जीएसटी नोंदणी केल्याचे व बोगस बिलांद्वारे १२ कोटींचा जीएसटी घोटाळा केल्याचे समोर आले होते. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय जीएसटीच्या कोल्हापूर विभागाच्या कर चुकवेगिरीविरोधी शाखेने ऑक्टोबर २०२५ मध्ये रामानंदनगर येथे तपासणी केली होती. एस. आर. मेटल या फर्मच्या माध्यमातून सुमारे ७० कोटी रुपयांची बनावट बिले तयार केल्याचे व या बिलांमध्ये सुमारे १२ कोटी रुपयांचा जीएसटी दाखवून इनपुट टॅक्स क्रेडिटचा (आयटीसी) गैरवापर केल्याचे तपासात उघड झाले होते. या नोंदणीमागील मुख्य सूत्रधार दिल्लीतील गोविंदसिंग असल्याची माहिती पुढे आली होती.

एस. आर. मेटल या फर्मच्या जीएसटी नोंदणीसाठी दिलेला पत्ता आणि नोंदणी तपासली असता, तेथे कोणतेही कार्यालय, गोदाम, कामगार किंवा व्यावसायिक व्यवहार अस्तित्वात नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे ही फर्म फक्त कागदोपत्री अस्तित्वात ठेवून बनावट बिले तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर जीएसटी विभागाने गोविंदसिंगविरोधात २४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. जीएसटी नोंदणी प्रक्रियेदरम्यान पलूसमधील एका कर सल्लागाराने संबंधित व्यापाऱ्याला आपला मोबाईल क्रमांक दिला होता. मात्र, या घोटाळ्यात त्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोणताही सहभाग आढळून न आल्याने त्याला या कारवाईतून वगळण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news