Delhi robbery: दिल्लीतील ज्वेलर्सच्या लुटीचा छडा; दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

पोलिस असल्याची बतावणी करून लूट : दोघांना अटक
Delhi robbery |
Delhi robbery: दिल्लीतील ज्वेलर्सच्या लुटीचा छडा; दीड कोटीचा मुद्देमाल जप्त Pudhari File Photo
Published on
Updated on

सांगली : दिल्लीतील भोला ज्वेलर्समध्ये झालेल्या लुटीचा छडा लावण्यात दिल्ली व सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक कोटी 56 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रशांत राजकुमार कदम (वय 25, रा. सोनी, ता. मिरज) आणि शुभम राजाराम कांबळे (36, रा. आरग, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत.

दिल्लीतील भोला ज्वेलर्समध्ये दि. 15 सप्टेंबर रोजी भरदिवसा लुटीचा प्रकार घडला होता. पोलिस असल्याची बतावणी करून ही लूट करण्यात आली होती. यावेळी एका कर्मचार्‍याचेही अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, फर्शबझार पोलिस घटनेचा तपास करीत होते. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील चोरट्यांनी ही चोरी केल्याचे तांत्रिक तपासात समोर आले.

प्रशांत कदम आणि शुभम कांबळे या दोघांचा जीवन नावाचा मित्र भोला ज्वेलर्समध्ये काम करत होता. जीवन याने दोघांना दिल्लीमध्ये बोलावून घेतले होते. त्यावेळी तो काम करीत असलेल्या भोला ज्वेलर्समध्ये मोठ्या प्रमाणात सोने, चांदीचे दागिने आणि रोकड असल्याची माहिती त्याने दोघांना दिली. लुटीचा प्लॅनही त्यानेच आखला. यासाठी पोलिस असल्याची बतावणी करून छापा टाकायचा, असे ठरले.

जीवन नेहमीप्रमाणे दि. 15 रोजी भोला ज्वेलर्समध्ये कामासाठी गेला. ज्वेलर्समध्ये मालक नसल्याची माहिती त्याने दोघांना दिली. त्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास प्रशांत आणि शुभम हे दोघे पोलिस असल्याची बतावणी करून ज्वेलर्समध्ये शिरले. ज्वेलर्समधील एक कोटी 40 हजाराचे एक किलो 400 ग्रॅम सोन्याचे दागिने, चार लाख 29 हजाराची तीन किलो चांदी आणि 20 लाखांची रोकड, असा मुद्देमाल त्यांनी धमकावून लुटला. यावेळी जीवन या त्यांच्याच मित्राच्या अपहरणाचा बनाव केला. कोणी पाठलाग केला, तर जीवनला मारून टाकण्याची धमकी देत त्यांनी ज्वेलर्समधून पलायन केले.

यानंतर दोघांनी जीवन याला जयपूरमध्ये सोडून सांगली गाठली. सांगलीत आल्यानंतर दोघांनी सोने, चांदी आणि रोख रकमेची वाटणी करून आपापले घर गाठले. दरम्यान, भरदिवसा मोठी लूट झाल्याने दिल्लीतील फर्शबझार पोलिस चोरट्यांच्या मागावर होते. तांत्रिक तपास केल्यानंतर दोघे चोरटे सोनी आणि आरग येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दिल्ली स्थानिक गुन्हे अन्वेषणने सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या मदतीने सोनी, आरगमध्ये छापा टाकून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील सर्व सोने, चांदीचे दागिने व 11 लाख 91 हजाराची रोकड जप्त केली. याबाबत पुढील तपास फर्शबझार पोलिस करीत आहेत.

दोघांना चार दिवसांची ट्रान्झिट रिमांड

दोघांना सोनी, आरग येथून अटक केल्यानंतर दिल्लीला पुढील तपासासाठी नेण्यात आले. यापूर्वी दोघांना सांगली न्यायालयात हजर केले. यावेळी सांगली न्यायालयाने दोघांना चार दिवसांची ट्रान्झिट रिमांड दिली आहे. त्यामुळे दिल्ली गुन्हे अन्वेषणचे पथक दोघांना घेऊन दिल्लीकडे रवाना झाले.

8 लाखांची रोकड गायब

दोघांनी भोला ज्वेलर्समधून 20 लाखांची रोकड लुटली होती; परंतु त्यांना अटक करण्यात आली, त्यावेळी त्यांच्याकडे 11 लाख 91 हजार रुपयांची रक्कम मिळून आली. दोघांनी 8 लाख 9 हजारांच्या रोख रकमेचे काय केले, यापैकी काही रक्कम भोला ज्वेलर्समध्ये काम करणार्‍या जीवन याला दिली होती का? की त्यांनीच खर्च केली? याचा तपास आता दिल्लीतील फर्शबझार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक करत आहे.

ज्वेलर्समधील कामगारच निघाला मुख्य सूत्रधार

भोला ज्वेलर्समध्ये काम करणारा जीवन नावाचा कामगारच या चोरीचा मुख्य सूत्रधार निघाला. त्यानेच प्रशांत आणि शुभम या दोन मित्रांना दिल्लीत बोलावून लुटीचा प्लॅन आखला. तसेच ज्वेलर्सच्या मालकाला संशय येऊ नये म्हणून स्वत:च्या अपहरणाचादेखील बनाव केल्याचे तपासात समोर आले आहे.

कदमवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

प्रशांत कदम आणि शुभम कांबळे या दोघांनी ही पहिलीच चोरी केली आहे; परंतु प्रशांत कदम याच्यावर यापूर्वी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. शुभम याच्यावर मात्र कोणताही गुन्हा नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news