

ईश्वरपूर : येथील जयंत पाटील खुले नाट्यगृहात दै. पुढारीच्या शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलला उदंड प्रतिसाद मिळाला. गेले पाच दिवस ईश्वरपूर शहरासह परिसरातील नागरिकांनी खाद्य, खरेदीबरोबरच मनोरंजनाचा आनंद लुटला. स्किल डान्स अँड फिटनेस स्टुडिओ कलाकारांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
दै. पुढारी आणि प्रतिराज युवा शक्तीच्यावतीने फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेतील महिला व बालकल्याण समिती व तनिष्का फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य हे फेस्टिव्हलचे सहयोगी प्रायोजक आहेत. सोमवारी राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी फेस्टिव्हलला भेट दिली. उरुण- ईश्वरपूरचे उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, पालिकेतील गटनेत्या अरुणादेवी पाटील, सातारा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रूपाली जाधव, उपसभापती मनीषा कुरळपकर, नगरसेविका शुभांगी शेळके, पुष्पलता खरात, सिनिअर एक्झिक्युटिव्ह मधू देसावळे, कस्तुरी जाधव, परी जाधव यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
सोमवारी रात्री प्रोफेशनल कोरिओग्राफर सुनील चव्हाण, संग्राम कांबळे, प्रिया चव्हाण यांचा स्किल डान्स अँड फिटनेस स्टुडिओ प्रस्तुत डान्सचा आविष्कार हा नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम झाला आहे. या स्पर्धेत सुमारे 30 कलाकारांनी भाग घेतला होता. ‘भूलभुलैया, नदीच्या पल्याड आईचा डोंगर...’ आदी मराठी, तसेच हिंदी लोकप्रिय गाण्यांवर नृत्य सादर केले. नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंग भरला. या स्पर्धेत दिशा अशोक शिंदे (शास्त्रीय नृत्य), आरोही महादेव जाधव (रॅप नृत्य), श्रीशा युवराज खिलारे (लोकनृत्य), तेजस्विनी स्वप्निल शिंदे (शास्त्रीय नृत्य) यांना अनुक्रमे क्रमांक मिळाले. सूरज डान्स अकॅडमी जतचे सूरज, इनोव्हेशन डान्स स्टुडिओ विट्याचे अजित सकटे परीक्षक होते. कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, वाळवा शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील, रूपाली जाधव यांच्याहस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला.