Dafalapur News: डफळापूरमध्ये हाणामारी

पंप चालकावर हल्ला करून सोन्याची चेन पळवली
Crime  News
Crime News pudhari
Published on
Updated on

जत शहर : डफळापूर (ता. जत) येथे उधारीवर दिलेल्या डिझेलचे पैसे मागितल्याच्या रागातून पेट्रोल पंपावर येऊन तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी हल्लेखोरांनी तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली असून, तलवार व बंदुकीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजी रामराव शिंदे (वय 24, रा. डफळापूर) हे डफळापूर-जत मार्गावरील भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप चालवतात. त्यांनी दीड महिन्यापूर्वी अक्षय महालिंग गडदे (रा. बाज, ता. जत) याला उधारीवर डिझेल दिले होते. रविवारी (दि. 12) सायंकाळी शिंदे यांनी उधारीचे 17 हजार रुपये मागितले असता, अक्षयने पैसे देण्यास नकार देत फोन कट केला.

पैसे मागितल्याचा राग मनात धरून रात्री 8 च्या सुमारास अक्षय गडदे, विकास रघू गडदे, मनोहर काशिंद, अविराज महालिंग गडदे यांच्यासह इतर चार अनोळखी दुचाकींवरून पेट्रोलपंपावर आले. त्यांनी शिंदे यांच्याशी वाद घालत दगड आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. याच गोंधळात विकास गडदे याने शिंदे यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून नेली.

घटनेवेळी उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी तलवार आणि बंदुकीने जिवे मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला. जखमी बालाजी शिंदे यांना तातडीने जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news