Drowning Case: डफळापुरात चार वर्षांच्या बालिकेचा पाण्यात बुडून मृत्यू

दोन दिवसाच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह बंधाऱ्यात सापडला
Drowning Case
Drowning Case: डफळापुरात चार वर्षांच्या बालिकेचा पाण्यात बुडून मृत्यूPudhari Photo
Published on
Updated on

जत : डफळापूर (ता. जत) येथे गुरुवारी सकाळी शेतात आजीसोबत आलेली रेणुका शिवदास ढोबळे ही चार वर्षांची बालिका गवताच्या ढिगाऱ्याजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. दोन दिवस चाललेल्या शोधमोहिमेनंतर शनिवारी सायंकाळी सहा वाजता जवळच एका बंधाऱ्यात तिचा मृतदेह आढळला. या घटनेने डफळापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवार, दि. 27 रोजी दुपारी पावणेबारा वाजता रेणुकाची आजी गवत काढायला गेली होती. यावेळी रेणुका गवताच्या ढिगावर खेळत होती. काही वेळाने ती अचानक दिसेनाशी झाली. आजी व गावकऱ्यांनी तत्काळ शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. घटनेची माहिती उशिरा पोलिसांना देण्यात आली. रेणुकाचे आजोबा आप्पा भाऊ ढोबळे (वय 75) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर पोलिसांनी विविध शक्यतांचा तपास सुरू केला. सांगली येथील जीव रक्षक दल, कोल्हापूर येथील श्वानपथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखा तसेच आयुष हेल्पलाइन टीमच्या सहकार्याने शोधमोहीम राबविण्यात आली. शनिवारी सायंकाळी सहा वाजता बंधाऱ्यात शोध घेत असताना रेणुकाचा मृतदेह पाण्यात आढळला.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, निरीक्षक संदीप कोळेकर, उपनिरीक्षक चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अच्युतराव माने, विक्रम घोदे, नाथा खोत, सुभाष काळेल यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल झाला. शोधमोहिमेत आयुष हेल्पलाईनचे अविनाश पवार, नरेश पाटील, सूरज शेख, कार्तिक होसमनी, गणेश जाधव, आदिल शेख आणि स्थानिकांनी मदत केली.

वैद्यकीय अहवालानंतर तपासाला मिळणार दिशा

रेणुका बेपत्ता झाल्यानंतर लगेचच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापूर येथील श्वानपथकासह जीवरक्षक दल तपासासाठी पाचारण करण्यात आले. दोन दिवस सलग शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर बंधाऱ्यात रेणुकाचा मृतदेह सापडला. रात्री उशिरा जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालानंतर तपासाला दिशा मिळणार आहे. सहजासहजी जाता येणार नाही, अशा ठिकाणी चारवर्षीय बालिका गेली कशी? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. श्वानदेखील विरोधी दिशेने घुटमळले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news