

सांगली : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही अयशस्वी ठरलेली योजना असून, याचे निकष बदलण्यात यावेत यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत ‘पुढारी’मध्ये 20 मे रोजी ‘मागासवर्गीय जमीनदार होणार कसे?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द झाले होते. त्याची दखल घेत त्यांनी हे निवेदन केले.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमिहीन शेतमजुराना सन्मानाने जगता यावे यासाठी सबलीकरण योजना सुरु करण्यात आली आहे. याला वीस वर्षाचा कालावधी उलटूनही याचा परिणाम दिसून आलेला नाही. शासन बाजारभावापेक्षा तीस टक्केहूनही कमी भावाने जमीन खरेदी करणार असल्यामुळे एवढ्या कमी भावात कोणी जमीन विक्री करीत नाही. यामुळे गेल्या सात वर्षात या योजनेचा एकालाही लाभ मिळालेला नाही. याबाबत विचारता रामदास आठवले म्हणाले की, शासनाची ही योजना अयशस्वी ठरली आहे. कमी भावाने कोणी जमीन देणार नाही. किमान गावात 25 टक्के जमीन ही गायरान असावी, असा नियम आहे. यामुळेही जमिनी मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
अधिक भूधारक असणार्यांनी यासाठी जमीन द्यावी अशी आमची मागणी आहे. सध्यातरी ही योजना अव्यावहारिक वाटत आहे. यामुळे या योजनेचे निकष बदलण्याची गरज आहे. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी करणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमिहीन शेतमजुराना सन्मानाने जगवण्यासाठी या योजनेची खूप गरज आहे. याला चालना देण्यात यावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.