

मिरज : अमेरिकेने भारतातून येणार्या वस्तूंवर व मालांवर 25 टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने ‘दीड हजार कोटींच्या निर्यातीला फटका शक्य, मिरज कुपवाड येथील निर्यातदार उद्योजक चिंतेत’, या मथळ्याखाली ठळकपणे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. या बातमीचे कात्रण शुक्रवारी कुपवाडच्या उद्योजकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मेलद्वारे पाठवले. हा कर रद्द करावा किंवा कराची रक्कम उद्योजकांना परत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत कुपवाडच्या कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सतीश मालू म्हणाले, दैनिक ‘पुढारी’ने उद्योजकांबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. याबद्दल दैनिक ‘पुढारी’चे अभिनंदन व आभार आम्ही मानतो. आज प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे आमच्या व्यथा त्यातून समाजासमोर मांडल्या गेल्या. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत ईमेलद्वारे मागणी केली आहे. अमेरिकेला निर्यात केलेल्या मालावर 25 टक्के कर आकारणे हा मोठा अन्याय आहे. हा अन्याय दूर करावा. 25 टक्के लादलेला कर रद्द करावा, यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत. किंवा त्या कराची रक्कम उद्योजकांना परतावा म्हणून द्यावी. अशी मागणी या ईमेलद्वारे करण्यात आली आहे. दैनिक ‘पुढारी’ प्रसिद्ध केलेल्या विशेष वृत्ताचे कात्रणही या मेलद्वारे त्यांना पाठवण्यात आले आहे.