

सांगली ः शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवार, दि. 30 रोजी सकाळी रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अंकली फाटा (ता. मिरज) येथे रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग ठप्प केला. याप्रकरणी खासदार विशाल पाटील यांच्यासह 50 ते 60 जणांवर प्रशासनाच्या बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शक्तिपीठ महामार्गाविरोधात जिल्ह्यात वातावरण पेटले आहे. याविरोधात महामार्गबाधित शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी बचाव समितीच्यावतीने सोमवारी सांगली-कोल्हापूर रस्त्यावर अंकली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात खासदार विशाल पाटील सहभागी झाले होते. जिल्हाधिकार्यांचा बंदी आदेश डावलून हे आंदोलन करण्यात आले.
शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलनात सहभागी खासदार विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय सतीश साखळकर (रा. सांगली), भूषण गुरव, घन:शाम नलावडे, विष्णू सावंत, पांडुरंग पवळ, प्रकाश टकले, अभिजित लाड, योगेश पाटील (सर्व रा. कवलापूर, ता. मिरज), प्रभाकर तोडकर (रा. मणेराजुरी, ता. तासगाव), प्रवीण पाटील, अभिजित जगताप, आनंदराव पाटील, अधिक पाटील, शुभांगी शिंदे (सर्व रा. बुधगाव, ता. मिरज), दिनकर साळुंखे (रा. माधवनगर, ता. मिरज), उमेश एडके, अनिल मिसाळ, राजू पाटील, युवराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विष्णू पाटील, संध्या कांबळे, प्रदीप माने, राजेश साळेकर, रोहन ऐडके, कृष्णा माने (सर्व रा. कर्नाळ, ता. मिरज), एकनाथ कोळी (रा. पद्माळे, ता. मिरज) यांच्यासह 40-50 आंदोलकांवर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 223, 126(2), 189(2), 190 व महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील कलम 135 (3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार लक्ष्मण सुखदेव जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आंदोलकांना नोटिसा बजावल्या आहेत.
जिल्हाधिकार्यांनी दि. 20 जूनरोजी बंदी आदेश जारी केला असतानाही, 1 जुलैरोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास आंदोलनकर्ते रस्त्यावर बसले. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘महामार्ग बंद झाला पाहिजे’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, अशा आक्रमक घोषणा देत आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग अडवला. यामुळे रस्त्यावरील वाहनचालक, प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.