

कुपवाड : कुपवाड शहर परिसर व औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक निर्माण होणे गरजेचे आहे. औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांची संख्या जास्त आहे. त्यातील कामगारांचे बॅकग्राऊंड आणि त्यांच्यातील अंतर्गत संघर्षाबाबत माहिती नसल्याने गुन्हेगारीत वाढ झाली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात पोलिसांची गस्त वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे तसेच स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवारी एमआयडीसी व परिसरातील उद्योजकांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीस पोलिस अधीक्षक संदीप घुगे, माजी आमदार दिनकर पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाडचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर, औद्योगिक महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, मिरज औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, माजी अध्यक्ष संजय अराणके, मराठा उद्योजक फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, उद्योजक डी. के. चौगुले, मनोज भोसले, रमेश आरवाडे, फुलचंद शिंदे उपस्थित होते.
संजय अराणके म्हणाले, मिरज एमआयडीसी परिसरात गुन्हेगारी व चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बंद पडलेल्या पोलिस चौक्या पुन्हा सुरू कराव्यात, तसेच पोलिसांची गस्त वाढवावी. शिवसेना संघटक बजरंग पाटील म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत सीसीटीव्ही फुटेज देऊनही पोलिस कारवाई करीत नाहीत. याकडे गंभीरपणे पाहणे गरजेचे आहे. मराठा उद्योजक फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा उद्योग मित्र बैठकीत उद्योजकांनी मांडलेल्या विविध विषयांचे निराकरण केले जात नाही. याकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. औद्योगिक महामंडळाने वाहनतळासाठी जागा उपलब्ध केल्यास त्याची जबाबदारी मराठा उद्योजक फाऊंडेशन घेईल. रमेश आरवाडे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात वाहनतळाची सुविधा नसल्याने मालवाहतूक वाहने रस्त्यावर थांबतात. विनोद पाटील, फुलचंद शिंदे यांनीही औद्योगिक परिसरातील समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.