

पुणे : शासकीय कामाचे बिल वेळेवर न मिळाल्याने सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याला आत्महत्या नव्हे, तर ‘सरकारने केलेला खून’ संबोधत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पवार म्हणाले, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत केलेल्या कामांची तब्बल 1 कोटी 40 लाख रुपयांची बिले शासनाकडे थकल्याने आणि घेतलेल्या कर्जाच्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत गावांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे केली होती. काम पूर्ण होऊनही शासनाकडून बिलाची रक्कम मिळत नव्हती. कामासाठी त्यांनी कर्ज उचलले होते. एकीकडे कामाचे पैसे अडकले होते, तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत होता. या दुहेरी संकटामुळे आलेल्या मानसिक त्रासातून त्यांनी आपले आयुष्य संपवले.
आमदार रोहित पवार म्हणाले, हर्षल पाटील यांना सुरुवातीला वेळेवर पैसे मिळाले, पण नंतर अधिकारी ‘पैसे नाहीत’ असे सांगू लागले. आज राज्यात कंत्राटदारांचे तब्बल 90 हजार कोटी रुपये थकले आहेत. यात दुर्दैवाने हर्षल पाटील यांच्यासारखे छोटे कंत्राटदार भरडले जात आहेत. आम्ही सातत्याने हे पैसे देण्याची मागणी करत आहोत. निवडणुका जिंकण्यासाठी घाईघाईने ‘लाडकी बहीण’ सारख्या योजना आणल्या जातात, पण ज्यांनी विकासकामे केली, त्या कंत्राटदारांना वार्यावर सोडले जाते. राज्यातील एक लाख कंत्राटदारांची सरकारने दिशाभूल केली आहे. सरकारने सर्व कंत्राटदारांचे थकीत पैसे तात्काळ द्यावेत, अन्यथा सरकारवर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानेही आक्रमक भूमिका घेतली असून, शासनाच्या दिरंगाईमुळे कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ येत असल्याचा आरोप केला आहे.