

मळणगाव : पुढारी वृत्तसेवा
कवठेमहांकाळ तालुक्याच्या 12 गावांतील 13 खासगी वॉटर एटीएमचे पाणी नमुने सूक्ष्मजीवीय अहवालानुसार दूषित आलेले आहेत. या 13 खासगी वॉटम एटीएमचा पिण्याचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात यावा, असे आदेश गटविकास अधिकारी उदय कुसूरकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोळेकर यांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत. तालुक्याच्या 25 गावांतील 44 खासगी वॉटर एटीएममधील पिण्याच्या पाण्याचे नमुने 1 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत माधवनगर येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी 12 गावांतील 13 खासगी वॉटर एटीएमचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या कनिष्ठ वैज्ञानिक अधिकार्यांनी दिला आहे.
पिण्यास अयोग्य पाण्यावर योग्य प्रमाणात क्लोरीनची प्रक्रिया करण्यात यावी. तसेच सूक्ष्मजीव तपासणी करून हे पाणी पिण्यास योग्य असल्याची खात्री करुन घ्यावी. मगंच अशा खासगी वॉटर एटीएमचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येईल, असा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या कनिष्ठ वैज्ञानिक अधिकार्यांनी दिला आहे. सदर अहवाल प्राप्त होताच गट विकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकार्यांनी ग्रामपंचायतींना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे की, पाणी दूषित आढळून आलेल्या खासगी वॉटर एटीएमचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
कोकळे (1), अलकुड एस (1), घाटनांद्रे (1), झुरेवाडी (1), शिंदेवाडी (1), अलकूड एम (1), खरशिंग (1), मळणगाव (1), लंगरपेठ (1), ढालगाव (1), आरेवाडी (1), ढालेवाडी (2) .