

सांगली ः काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने सडेतोड प्रत्युत्तर दिले. दोनच दिवसात पाकपुरस्कृत दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत केले. पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली. भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय शौर्याला सलाम व शहीद जवान आणि अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करीत बुधवारी काँग्रेसतर्फे शहरातील हुतात्मा स्मारक ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.
भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दाखवलेल्या पराक्रमाबद्दल देशभरात राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी (दहशतवादविरोधी दिन) ठिकठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी सांगलीत काँग्रेसतर्फे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
हुतात्मा स्मारकाला खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील व विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तिरंगा पदयात्रेला सुरुवात झाली. काँग्रेस भवनासमोर राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हुतात्मा स्मारक-कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा-सिव्हिल हॉस्पिटल-राममंदिर-काँग्रेस भवन- आझाद चौकमार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ सभेची सांगता झाली. सांगता सभेत खासदार पाटील म्हणाले, आपण युध्दभूमीपासून लांब आहोत, पण सैनिकांचा जीव धोक्यात असतो. आपण त्यांच्यामुळे सुरक्षित आहोत.
डॉ. कदम म्हणाले, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. भारत कोणासमोर झुकत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. या तिरंगा यात्रेने सांगलीतील नागरिकांनी एकजुटीचा संदेश दिला आहे.
शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या व ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या कुटुंबीयांना केंद्र शासनाने व काश्मीर सरकारने नोकरी द्यावी. आर्थिक मदत करावी. माजी आमदार सावंत, डॉ. जितेश कदम यांचीही भाषणे झाली.
यावेळी बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, अय्याज नायकवडी, करीम मेस्त्री, डॉ. शिकंदर जमादार, मयूर पाटील, नंदकुमार शेळके, सुभाष खोत, तौफिक शिकलगार, इलाही बारूदवाले, अजिज मेस्त्री, रवींद्र वळवडे, सचिन चव्हाण, विनायक रुपनूर आदी उपस्थित होते.