

सांगली : एकेकाळी सांगली जिल्हा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरील काँग्रेसचा भक्कम बालेकिल्ला. स्वातंत्र्य चळवळीपासून काँग्रेसचा प्रभाव निर्माण झालेला. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, राजारामबापू, गुलाबराव पाटील, प्रा. एन. डी. पाटील यांसारख्या नेत्यांनी जिल्ह्याच्या राजकारण, समाजकारणाला दिशा दिली. राज्याच्या सत्तेवर प्रभाव टाकला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता म्हणजे काँग्रेस असा त्याकाळचा नियमच होता. काँग्रेस हाच जिल्ह्याचा डीएनए होता. पण 2014 पासून जिल्ह्याच्या राजकीय ‘डीएनए’ मध्ये गडबड सुरू झाली. सत्ता, वैयक्तिक लाभासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले. एकेकाळी जिल्ह्यात खिजगणतीतही नसलेला भाजप आज सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला गळती आणि भाजपमध्ये भरती सुरू आहे.
डीएनए हे एक रेणू आहे, जे जीवाच्या विकासासाठी आणि कार्यासाठी आवश्यक असलेल्या अनुवंशिक माहितीला घेऊन जाते. एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे संक्रमित करते. याचप्रमाणे सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचा डीएनए म्हणजे काँग्रेस होता. दशकानुदशके जिल्ह्याच्या राजकीय मांडणीत, नेतृत्वात आणि सत्तेच्या समीकरणात काँग्रेसचेच जीन वाहत होते. याचे मूळ देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आहे. तेव्हापासून इथल्या जनमानसांवर काँग्रेसचा प्रभाव आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या प्रांतिक निवडणुका आणि स्वातंत्र्यानंतरच्या निवडणुकांमध्येही काँग्रेसचे वर्चस्व राहिले, अपवाद संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, राजारामबापू हे काँग्रेसी राजकीय नेतृत्व सांगलीने देशाला, राज्याला दिले. या नेतृत्वाने पायाभूत सुविधा निर्माण केल्या. कृषी-औद्योगिक विकासाला चालना दिली. देश, राज्यात काँग्रेसची सत्ता. जिल्हा लोकल बोर्ड पुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांही काँग्रेसच्याच विचाराच्या. शेकाप, कम्युनिस्ट पक्षाचे प्रभावक्षेत्र मर्यादित भागात होते, पण भाजप कुठेच नव्हता. सांगली नगरपालिकेत एखादा-दुसरा नगरसेवक भाजपचा असायचा. एकूणच जिल्ह्याचा राजकीय डीएनए काँग्रेस हाच होता. काँग्रेस संघटित होती.
वसंतदादा, राजारामबापू, गुलाबराव पाटील यांच्यानंतर काँग्रेसची धुरा शिवाजीराव देशमुख, डॉ. पतंगराव कदम, प्रकाशबापू पाटील, राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर जयंत पाटील, आर. आर. पाटील या नेत्यांनी सांभाळली. राष्ट्रवादीचा मूळ डीएनएही काँग्रेसच. त्याअर्थाने सत्तेतील स्पर्धा ही प्रामुख्याने काँग्रेसच्या आतल्या गटांमध्येच व्हायची, पण गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणाने संघटित काँग्रेस विघटीत होऊ लागली. विधानसभेच्या 1995 च्या निवडणुकीत जिल्ह्यातून 5 अपक्ष उमेदवार निवडून आले. त्यांनी युतीला पाठिंबा दिला. शिवसेना-भाजप युती सरकारने जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पाणी योजनांना गती दिली. पण तरीही जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचाच ‘डीएनए’ प्रभावी होता.
भाजपमध्ये प्रस्थापितांचे इनकमिंग मात्र लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत मोदी लाट जोरात होती, मात्र केवळ लाट असून उपयोग नाही. लाटेवर स्वार होणार्यांचीही गरज असते. भाजपने मग लाटेवर स्वार होणार्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मोदी लाटेची ताकद आणि राजकारणाचे फिरलेले वारे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही मंडळी भाजपमध्ये दाखल झाली. मूळचे काँग्रेसचे, पण नंतर राष्ट्रवादीत गेलेले संजय पाटील हे भाजपमध्ये डेरेदाखल झाले आणि लोकसभेला भाजपचे उमेदवार बनले. विलासराव जगताप, माजीमंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हेही यादरम्यानच भाजपच्या छावणीत डेरेदाखल झाले. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. 1957 नंतर काँग्रेस प्रथम पराभूत झाली. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच भाजपचे कमळ फुलले. या विजयास मोदी लाट कारणीभूत आहे, पण काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेते, कार्यकर्त्यांची ताकदही निर्णायकी ठरली. विधानसभा निवडणुकीतही भाजपची सरशी झाली. भाजपने 2019 मध्ये लोकसभा दुसर्यांदा जिंकली.
भाजपला निवडणुकीतील यशाचे राजकारण चांगलेच माहिती आहे. विकास कामांबरोबरच विरोधकांना कमकुवत करून आपले प्रभावक्षेत्र वाढविण्यावर भाजपने लक्ष केंद्रीत केले. जिल्हा परिषदेच्या 2017 च्या निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजकीय व्यूहरचना केली. पक्षात ‘इनकमिंग’ सुरू ठेवले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा नाट्यमय भाजप प्रवेश जिल्ह्याने पाहिला. खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख या सार्या मंडळीच्या जोरावर भाजपने जिल्हापरिषदेत शून्यावरून सव्वीस जागा पटकावण्यापर्यंत मजल मारली. माजीमंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार अनिल बाबर यांची कुमकही भाजपला मिळाली. ‘महाडिक, नायकवडी, नाईक, पाटील’ यांच्या नेतृत्वाखालील रयत विकास आघाडीचे चार सदस्यही भाजपसोबत राहीले. यापूर्वी एकही सदस्य निवडून न आलेल्या भाजपची जिल्हा परिषदेत सत्ता आली. शून्यातून सत्तेची अचाट कामगिरी भाजपने केली, पण भाजपच्या सत्तेतील चेहरे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस, राष्ट्रवादीचेच होते.
महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीतही भाजपने आयारामांच्या जोरावर घवघवीत यश मिळवले. महापालिकेत 78 पैकी 41 सदस्य भाजपचे झाले. महापालिका निवडणुकीतही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातले होते. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार दिनकर पाटील, दिलीप सूर्यवंशी, सुरेश आवटी तसेच लहान, मोठे नेते, कार्यकर्ते यांचे बळ महत्त्वपूर्ण ठरले. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत भाजपने आयात नेत्यांचा पुरेपूर वापर केला.
जिल्ह्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. भाजपने पुन्हा ‘इनकमिंग’ सुरू ठेवले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची अनेकदा ऑफर दिली. मात्र विशाल पाटील हे त्यांना खेळवत राहिले. त्यामुळे चंद्रकांतदादांनी वसंतदादांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. वसंतदादा बँकेच्या प्रकरणातून सहीसलामत सोडवणे आणि राजकीय संधी देण्याच्या अटीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पूर्वाश्रमीचे भाजप नेते अण्णा डांगे यांचाही भाजप प्रवेश झाला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही भाजपमध्ये गेले. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते व क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्याभोवती भाजपने गळ टाकला आहे. भाजपने ‘सबका साथ, सबका विकास’ याचा चपखल वापर करत इनकमिंग सुरूच ठेवले आहे. जिल्ह्यातील आजची भाजप पाहिली की पूर्वाश्रमीची काँग्रेसच वाटू लागली आहे. भाजपच्या व्यासपीठावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे नेतेच अधिक संख्येने दिसून येत आहेत. राजकारणात विचारसरणी, सेवाभाव आणि तत्त्वनिष्ठा यांचा क्षय होत आहे. ‘सेवाभाव संपून मेवाभाव’ वाढीस लागला आहे. सेवाभाव, संघटन, संघर्ष हे जुन्या पिढीचे हत्यार होते. आज राजकारणाचा चेहरा बदलला आहे.
जिल्ह्यात शेकाप, कम्युनिस्ट, समाजवाद्यांचेही ठरावीक प्रभावक्षेत्र होते. पण हे सर्व पक्षही आता राजकीय स्मरणिकेत राहिले आहेत. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड यांनी उजव्या विचारसरणीला प्रखर विरोध केला, पण त्यांचे नातू आज महायुतीच्या प्रभावाखाली आले आहेत. एकूणच काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात गेला आहे. पण सत्तेच्या या खेळात खरा पराभव जर कुणाचा होत असेल, तर तो जनतेच्या अपेक्षांचा.
राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, युवा नेते रोहित आर. आर. पाटील हे जिल्ह्यात महाविकास आघाडीला उभारी देऊ शकतात. पण त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांनी कुरघोडीचे, जिरवाजिरवीचे राजकारण सोडून खर्या मनाने एकत्र येणे गरजेचे आहे. कुरघोडी होऊनही सांगली लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने कल दाखवून दिला आहे. तो जाणून न घेतल्यास जिल्ह्याचे राजकीय शिवार भाजपसाठी मोकळे होणार, हे निश्चित.