

सांगली : आता कोणतीही निवडणूक नाही. या मोकळ्या वेळात आम्ही आमचं घर म्हणजे काँग्रेस पक्ष साफसफाई करून नेटका करत आहोत. महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात ही मोहीम सुरू असून काँग्रेस पक्ष जुन्या निष्ठावंतांना बळ देत नव्या दमाच्या नव्या कार्यकर्त्यांना संधी देणार आहे. स्थानिक पातळीवर अधिकारही देणार आहे. आगामी सार्या निवडणुकांसाठी आम्ही नव्या दमाने सज्ज आहोत, अशी माहिती पक्ष निरीक्षक रामहरी रुपनवर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
रुपनवर म्हणाले, बरेच ब्लॉक अधिकारी हे नेत्यांचे नातेवाईक किंवा त्यांच्या जवळचेच असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करून अहवाल मागवण्यात आले. त्यानुसार सांगली शहर व ग्रामीण काँग्रेसमधील 16 ब्लॉक्समध्ये जाऊन, माहिती घेऊन अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठवले जातील आणि मग तेच तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची निवड करतील. झालेल्या निवडणुकांमध्ये कॉँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसल्याने पक्षात थोडी नाराजी आहे. अपयश मिळाल्यानंतर सेनापती आपले सैन्य तपासतो, त्यात बदल करून ते नव्याने तयार करतो. तसेच काँग्रेसमध्येही काही नवे बदल होत आहेत. आमच्या अधिकृत उमेदवारांविरुध्द आमचाच उमेदवार उभा राहतो, हे दुर्दैव आहे. असे झाले तर काही अॅक्शन्स घ्याव्या लागतात. म्हणूनच पक्षाने बंडखोरांना पक्षातून काढून टाकले. नंतरही त्यांना पक्षात घेतले जाणार नाही. जो पक्षासाठी वेळ देईल, अशा नव्या कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचा इरादा आहे.
राज्यात रोज नवा तमाशा सुरू आहे. एका बाजूला महिलांच्या हत्या, महागाई, हत्याकांडे घडत असताना दुसर्या बाजूला सरकारमध्ये सहभागी असलेले पक्षच कसे काय मोर्चे काढतात?, हा काय प्रकार आहे? एकप्रकारे सरकारच दंगल घडवते आहे, हे देशात पहिल्यांदाच घडत आहे. यावेळी सहनिरीक्षक आदित्य पाटील, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आशिष कोरी, अजित ढोले, बिपीन शेवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
देशभर भीतीचे, शंकेचे, संशयाचे, अविश्वासाचे वातावरण आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्थेबाबतही समाजात शंका आहे. मोगल आणि इंग्रज राजवटीसारखी परिस्थिती आहे. राज्य हिंदूंचे आहे असे म्हणताना हिंदू खतरेमें आहे, असेही सांगतात. भीती दाखवून राज्य करायचे हे धोरण घातकी आहे. स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात असताना ते वाचवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा, अशी जनतेतूनच मागणी आहे, असे रुपनवर यांनी सांगितले.
खासदार विशाल पाटील संसदेत काँग्रेस सदस्य म्हणूनच बसतात. इथे ते काय म्हणतात ते माहिती नाही, पण ते काँग्रेसचेच आहेत. खासदार झाल्यानंतर त्यांनी पक्षाला तसे पत्रही दिले आहे, असे मत रुपनवर यांनी व्यक्त केले.