

सांगली ः नवीन शैक्षणिक वर्षात सरकारने पहिलीच्या वर्गासाठी ‘सीबीएसई’ पॅटर्न सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 1 एप्रिलपासून शाळा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र अजूनही शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडे आदेश नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा कधी सुरू होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा अंगणवाडी ते दुसरीपर्यंत अभ्यासक्रम बदलणार आहे. बालभारतीकडून सध्या युद्धपातळीवर पुस्तकांची छपाई सुरू आहे. ‘सीबीएसई’च्या शाळा 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र शिक्षण विभागाला अजूनही याबाबत कोणत्याही सूचना नाहीत. शैक्षणिक वर्षात शाळांना एकूण 76 दिवस सार्वजनिक सुट्या असतात. याशिवाय दर रविवारीदेखील (एकूण 52 रविवार) शाळांना सुटी असते. एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा संपल्यावर विद्यार्थी शाळेला येतच नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वर्षात 365 दिवसांपैकी 220 दिवसदेखील अध्यापन होत नाही. या पार्श्वभूमीवर एप्रिलपासून शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.