सांगली : पुढारी वृत्तसेवा
श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणरायाला पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणुकीने उत्साहात निरोप देण्यात आला. संस्थानच्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी सांगलीसह पंचक्रोशीतील हजारो गणेशभक्तांनी मिरवणूक मार्गावर व कृष्णातिरी गर्दी केली होती. ‘गणपती बाप्पा मोरया..., पुढच्या वर्षी लवकर या...’चा गजर नदीकाठावर सुरू होता.
सांगलीच्या गणपती पंचायतनच्या श्रींचे विसर्जन गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी केले जाते. राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये श्रींची प्रतिष्ठापना केली जाते. पाच दिवस गणेशोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला जातो. बुधवारी पाचव्या दिवशी दरबार हॉलमध्ये दुपारी संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी अधिपती श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, राजलक्ष्मीराजे पटवर्धन, राजकन्या मधुवंतीराजे पटवर्धन, पौर्णिमाराजे, संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते. यानंतर श्रींची मूर्ती सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आली आणि मिरवणुकीस प्रारंभ झाला. दरबार सभागृहातून राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती पेठ - टिळक चौक या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. झांज, ढोल, लेझीम आदी पारंपरिक वाद्यावर अनेकांनी ठेका धरला होता.
त्याशिवाय युवक आणि युवती पारंपरिक वेषात फेटे, भगवे तसेच केशरी कपडे परिधान केलेली पथके हातात भगवे ध्वज घेऊन सहभागी होती. मिरवणूक मार्गावर रथातील श्रींच्या मूर्तीवर भाविकांकडून पेढे उधळण्यात येत होते. काहीजण खोबरे, खारीक वाटत होते. त्याशिवाय सजवलेले घोडे या मिरवणुकीत सहभागी झाली होती. सांगली आणि पंचक्रोशीतील गावातील हजारो गणेश भक्त मिरवणूक पाहण्यास उपस्थित होते.
संस्थानच्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने विसर्जन मार्गावर नदीकाठावर अनेक स्त्री - पुरुषांनी फुगडीचा फेरा धरला होता. उत्साहाचा माहोल सर्वत्र दिसून येत होता.
संस्थानच्या श्रींची मिरवणूक शाही लवाजम्यासह सरकारी घाटावर आली. त्यावेळी श्रींना निरोप देण्यासाठी हजारो भाविकांनी घाट फुलून गेला होता. संस्थानच्या श्रींचे विसर्जन कृष्णा नदीत करण्यासाठी नाव सजवण्यात येते. त्यावर विद्युत रोषणाईही केलेली असते. या नावेतून श्रींची मूर्ती नदीत नेऊन विसर्जित केली जाते. हा मान आंबी परिवाराला असतो. या परिवारातील विश्वेश आंबी, गजानन आंबी, विजय आंबी, तुषार आंबी, महादेव आंबी यांनी मिरवणूक घाटावर आल्यावर विजयसिंहराजे, अभ्यंकर यांचा सत्कार केला. त्यानंतर श्रींची मूर्ती नावेतून नेऊन कृष्णा नदीपात्रात नेऊन आरती करून विसर्जित केली.