

सांगली ः कृष्णा नदी स्वच्छता, प्रदूषणमुक्तीसाठी कार्यरत असलेल्या ‘जयतु कृष्णे’ अभियानाला मोठे यश लाभले आहे. अभियानाचे संस्थापक राकेश दड्डणावर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी ठोस उपाययोजनांची विनंती करणारे निवेदन दिले होते. या निवेदनात कृष्णा नदी परिसरात प्लास्टिक, कचरा, सांडपाणी, औद्योगिक घाण यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे निदर्शनास आणले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेऊन शासनस्तरावर मान्यता देण्याच्यादृष्टीने कार्यवाही व्हावी, यासाठी अप्पर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग, मुंबई यांना कार्यवाहीसाठी निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कृष्णामाई स्वच्छता रॅलीचे आयोजन करीत लोकजागृती सुरू केल्याबद्दल राकेश दड्डणावर व टीमचे कौतुक करीत या अभियानास सहकार्य करण्याचा शब्द दिला.
सांगलीत झालेल्या ‘भव्य कृष्णामाई स्वच्छता रॅली’मध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे मोठ्या लोकचळवळीचा जन्म झाला असून, यामध्ये शासनानेही पुढाकार घ्यावा, अशी मागणी राकेश दड्डणावर यांनी केली. ‘जयतु कृष्णे’ अभियानास ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर राज्यस्तरीय अभियान म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी करत केंद्र सरकारकडेही यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे दड्डणावर यांनी सुचवले. दड्डणावर म्हणाले, ही निव्वळ मागणी नाही तर अस्मितेचा मुद्दा आहे. या अभियानानंतरच्या पहिल्याच भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृष्णामाई स्वच्छता रॅलीचे कौतुक केले.