

आष्टा : संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ. डांगे यांच्या ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राचे प्रकाशन तसेच शैक्षणिक संकुलातील विविध नवीन इमारतींचे उद्घाटन पार पडणार आहे.
हा सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असणार आहेत. या राज्यस्तरीय सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सुभद्रा इंटरनॅशनल स्कूल, अण्णासाहेब डांगे फार्मसी कॉलेज आणि अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या अद्ययावत इमारतींचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केले जाईल.
सोहळ्यासाठी शैक्षणिक संकुलात १.३२ लाख चौरस फुटांचा अत्याधुनिक जर्मन हँगर पद्धतीचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. यामध्ये २० हजार नागरिकांच्या बसण्याची सोय असून, १०० प्रमुख पाहुण्यांसाठी ३ हजार चौरस फुटांचा व्यासपीठ तयार करण्यात आला आहे. ७ मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात येत आहेत. कार्यक्रमासाठी शिराळकर कॉलनी मैदान, आंबेडकर भवन आणि स्पोर्ट कॉम्प्लेक्स परिसरात वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी संस्थेचे सचिव ॲड. चिमण डांगे व सहसचिव विश्वनाथ डांगे यांनी निमंत्रण मोहीम राबवली.