

सांगली : शहरातील पंचशीलनगर येथे निवडणूक प्रचाराच्या वादातून दाम्पत्यास बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आनंदा वसंत लिगाडे यांनी तिघांविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सचिन चंद्रकांत ओमासे (रा. शिंदेमळा, सांगली), गणेश गोविंद चौगुले (रा. पंचशीलनगर, सांगली) आणि विकास संदीपान सोलंकर (रा. रेल्वे गेटजवळ, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.
फिर्यादी आनंदा लिगाडे व सर्व संशयित हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आनंदा लिगाडे हे काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचे काम करीत आहेत, तर संशयित हे भाजप पक्षाच्या उमेदवाराचे काम करीत आहेत. आनंदा लिगाडे हे पंचशीलनगर येथे गेले होते. त्यावेळी तिघा संशयितांनी त्यांना अडविले. यावेळी त्यांनी ‘आमच्या पक्षाचे काम कर’, असे त्यांना सांगितले. त्यावेळी आनंदा यांनी ‘मी आमच्याच पक्षाचे काम करणार, तुमच्या पक्षाचे काम करणार नाही’, असे सांगितले. त्यानंतर तिघांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी आनंदा यांच्या पत्नी आरती लिगाडे या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या काळात ठिकठिकाणी मारामारीच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी मतदारांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकाराला पोलिसांनी तातडीने आळा घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.