

सांगली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी इयत्ता चौथीची प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि सातवीची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दि. 26 एप्रिलरोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी याबाबत पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, यावर्षीपासून चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासनाने 2015 मध्ये राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता चौथीऐवजी पाचवी व सातवीऐवजी आठवी असा केला होता. त्यामुळे 2016-17 पासून पाचवी आणि आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती.
मात्र यानंतर या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात चौथीपर्यंत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विशेष करून चौथी इयत्तेपर्यंत असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसला होता. त्यांना या परीक्षेस बसता येत नव्हते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, त्यांना स्पर्धा परीक्षेस बसण्याचा अनुभव मिळावा, या हेतूने यंदापासून पुन्हा इयत्ता चौथी व सातवीसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे.
यंदाच्या 2025-26 या शैक्षणिक सत्राची चौथीची आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. त्याची तारीख दि. 26 एप्रिल अशी निश्चित करण्यात आली आहे. या परीक्षेची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.