

सांगली : शामरावनगर येथील अल्अमीन शाळेजवळ दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. दोन्ही बाजूच्या बाराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजस्विनी राहुल मोरे (वय 20, रा. जकात नाका, मिरज) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित फिरोज पटवेगार, रेश्मा फिरोज पटवेगार, सिद्धीक फिरोज पटवेगार, समत फिरोज पटवेगार आणि तीन अनोळखी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तेजस्विनी या शामरावनगर येथे मावस बहिणीकडे आल्या होत्या. दि. 9 रोजी त्यांची दीड वर्षाची भाची पटवेगार यांच्या दुकानात खाऊ आणायला गेली होती. ती बराचवेळ दुकानाबाहेर उभी होती. त्यामुळे तेजस्विनी यांनी ‘तिला खाऊ द्या’ असे म्हणताच रेश्मा हिने, ‘दुकानात यायचे नाही’ म्हणून त्यांच्या भाचीला ढकलून दिले. याचा जाब विचारताच शिवीगाळ करून रेश्मा, फिरोज व त्यांच्या दोन मुलांनी मारहाण केली. त्यांची बहीण मनीषा सोनुले व मीना गजगेश्वर वाचवण्यास आल्या. तेजस्विनी यांना रुग्णालयात नेत असताना पुन्हा फिरोज साथीदारांना घेऊन आला. त्याने तेजस्विनी यांचा मावसभाऊ आदित्य गजगेश्वर याला मारहाण केली. त्यानंतर पोलिस येताच सर्वजण पळून गेले.
दरम्यान, रेश्मा पटवेगार यांनी संशयित मीना गजगेश्वर, गीता (पूर्ण नाव नाही), दीदी (पूर्ण नाव नाही), आरोही (पूर्ण नाव नाही), आदित्य गजगेश्वर, अरू गजगेश्वर यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 9 रोजी सायंकाळी रेश्मा यांची सासू सुरैया या दुकानात होत्या. तेव्हा लहान मुलगी पैसे न घेता आल्यामुळे तिला परत पाठवताना दीदी नावाच्या महिलेने वाद घातला. सुरैया व रेश्मा यांना धक्काबुक्की केली.
रेश्मा यांना पकडून रस्त्यावर नेले. तेथे खाली पाडून दीदीसह मीना, गीता, आरोही यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मुलगा महंमदसिद्धीक सोडवण्यास आल्यानंतर त्यालाही ढकलून दिले. काही वेळाने आमच्या दुचाकीवर वीट फेकली. पती फिरोज यांनी संशयित रोहित याला जाब विचारल्यानंतर त्याने व त्याचा भाऊ आदित्यने त्यांना मारहाण केली.