

शिराळा शहर : ग्रामीण भागात चिमण्यांचा चिवचिवाट अन् पक्ष्यांची किलबिल सुरू झाली की, शेतकरी तांबड फुटलं म्हणत झोपेतून उठून आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात करत. भल्या पहाटे पक्ष्यांची किलबिल शेतकर्यांसाठी एक प्रकारे अलार्मच होता. परंतु, काळाच्या ओघात पक्ष्यांची किलबिल ग्रामीण भागातूनही लोप पावत चालली आहे.
जलाशयाच्या ठिकाणी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारे विविध जातींचे परदेशी पक्षी पाहण्याचे आकर्षण वाढत आहे. परंतु, आपल्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. पक्ष्यांच्या घटत्या संख्येचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. पक्षी कीटकभक्षी असल्याने त्यांचे अस्तित्व ही काळाची गरज आहे. शिराळा तालुका भात आणि उसाचे पठार म्हणून ओळखला जातो. तसेच सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, उत्पादनामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात विविध पक्ष्यांंची संख्या आढळून येते. चिमणी तर सर्वात अधिक आढळणारा पक्षी. परंतु, आता पीकक्षेत्र घटत चालल्याने पक्ष्यांच्या संख्येत घट होत असल्याचे जाणवते.
पूर्वी पाचरटाचे छप्पर, कौलारू घरे, झोपडी, माळदाची घरे आदींमध्ये शेतकरी राहात असे. तसेच, घराशेजारी बोर- बाभळींची झुडपे मोठ्या प्रमाणात असत. त्यामुळे विविध पक्ष्यांचा वावर मानवीवस्तीजवळ आढळत होता. चिमणी घरात, अंगणात स्वच्छंदपणे बागडताना दिसे. चिमण्यांचे घरटे घरातही आढळून येई, तर खोपा घरा शेजारी असणार्या वृक्षांवर दिसून येत असे. पक्ष्यांच्या सांकेतिक भाषांवरून शेतकरी हवामानाचा अंदाज लावत असे. कावळ्याचे घरटे किती उंचीवर याच्यावरून पावसाचा अंदाज, तर पावश्या पक्ष्याचे ओरडणे यावरून शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीची कामे करत असत. परंतु, आधुनिकीकरणामुळे सिमेंटचे जंगल आले अन् बोरी बाभळींची झाडे लोप पावत गेली. जंगलातील मनुष्याचा अधिवास वाढल्यामुळे पक्ष्यांवर विपरीत परिणाम होऊन तालुक्यातील पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसून येते. याचा फटका दशक्रिया विधीला कावळ्यांच्या घटलेल्या संख्येमुळे दिसून येतो.
शिराळा तालुक्यातील वन विभागाच्या मंडलात ही याची उणीव प्रकर्षाने जाणवते. जंगलातील मानवाचा वाढता अधिवास, तसेच अन्न, पाण्याची उपलब्धता होत नसल्याने पक्ष्यांच्या संख्येत घट होत आहे. पक्षी अभ्यासकांच्या मते गेल्या 25 वर्षांत चिमण्यांच्या संख्येत सुमारे 80 टक्के घट झाली, तर इतर पक्ष्यांंची आकडेवारीही चिंताजनक आहे. पक्षी कीटकभक्षी असल्याने त्यांचे जतन व संवर्धन होणे काळाची गरज आहे. शिराळा तालुक्यात गतवर्षी टलास मॉथ नावाचे दुर्मीळ फुलपाखरू आढळले होते. हे जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक आहे. शिराळा येथील बस स्थानक परिसरात ते आढळले होते.