

विटा : कचऱ्याचे गाठोडे कालव्यात टाकल्यानंतर ते पाण्यासोबत कुठे वाहून जाते, हे पाहण्याच्या कुतूहलापोटी एका सातवर्षीय चिमुरड्याला जीव गमवावा लागला. राजवीर सोमनाथ जाधव (वय 7, रा. आळसंद, ता. खानापूर) असे मृत बालकाचे नाव आहे. आळसंद येथील आरफळ कालव्याच्या पात्रात गुरुवार, दि. 15 रोजी दुपारी ही घटना घडली.
गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राजवीर विटा-कुंडल रस्त्यावरील आरफळ कालव्यावर गेला होता. घरच्यांनी दिलेले चिंध्यांचे बोचके त्याने कालव्याच्या पुलावरून पाण्यात टाकले. टाकलेले बोचके पाण्याच्या प्रवाहाबरोबर कुठे जाते, हे पाहण्यासाठी तो पुलावरून खाली कालव्याच्या काठावर धावत आला. मात्र, पाण्याचा वेग आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाय घसरून तो थेट कालव्यात कोसळला. काही महिलांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी आरडाओरड करून मदतीसाठी हाक दिली, मात्र पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने काही क्षणांतच राजवीर वाहून गेला. राजवीर आळसंद जिल्हा परिषद शाळेत पहिलीत शिकत होता. 6 जानेवारीस त्याचा वाढदिवस उत्साहात साजरा केला होता. त्याच्या अपघाती निधनामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सहा किलोमीटर अंतरावर सापडला मृतदेह
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणांनी पाण्यात उतरून शोधकार्य सुरू केले, मात्र पाण्याचा वेग अडथळा ठरत होता. अखेर काही तासांनंतर, घटनास्थळापासून सहा किलोमीटर अंतरावर राजवीरचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.